कोल्हापूर : लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, असे वादग्रस्त विधान भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी रात्री येथे एका सभेत केले. त्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांनी या विधानावरून खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यातील महिलांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर काँग्रेसचे गटनेते विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी ही तर धनंजय महाडिक यांची मुजोरी, अशा शब्दात हल्ला चढवलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण हा प्रचाराचा केंद्रबिंदू बनला आहे. कोल्हापुरात झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेत १५०० रुपये ऐवजी दरमहा २१०९ रुपये देण्याची घोषणा केली आहे..तर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये देण्याची जाहीर करण्यात आले आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये टीकाटिपणी सुरू आहे.

हेही वाचा >>>पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र

तर या मुद्द्याला स्पर्श करताना आज खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले,लाडकी बहिणी योजनेचे १५०० रुपये घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅली दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या. त्यांची नावे लिहून ठेवा.आपल्या शासनाचे घ्यायचे आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. त्यांचे फोटो आमच्याकडे द्या. त्यांची व्यवस्था करतो.  कोण जास्त बोलायला लागली किंवा दारात आली तर तिला फॉर्म द्यायचा आणि यावर सही कर म्हणायचे. आम्ही पैसे लगेच बंद करतो, असा इशाराही  महाडिक यांनी दिला.

 दरम्यान, महाडिक यांच्या विधानावर कोल्हापुरात बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे . येथे महिलांचा सन्मान केला जातो. परंतु धनंजय महाडिक यांनी महिलांचा अवमान केला आहे. त्यांनी राज्यातील समस्त महिलांची माफी मागितली पाहिजे. यातून भाजपची महिलांवकडे पाहण्याचे नेमकी प्रवृत्ती काय हेच दिसले आहे..त्यांच्या या विधानाचा निषेध नोंदवते, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

तर सतेज पाटील यांनी फेसबुक वर एक पोस्ट शेअर करीत धनंजय महाडिक यांची ही मुजोरी असल्याच्या हल्ला चढवला आहे. ‘भाजप खासदार धनंजय महाडिक यांची मुजोरी.महिलांना जाहीर सभेत धमकी .काँग्रेसच्या रॅली, सभेत महिला दिसल्या तर त्यांचे फोटो काढा आणि आमच्याकडे द्या.आम्ही व्यवस्था करतो त्यांची !,’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा >>>चळवळींनी प्रवाहातील राजकारणाशी जोडून घेणे आवश्यक – जालिंदर पाटील

या प्रकरणी सतेज पाटील यांनी आणखी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या राज्यात विरोधकांच्या सुनेलाही साडी चोळी देऊन परत पाठवण्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेला आहे. धनंजय महाडिक हे भाजपचे खासदार आहेत. त्यांनी उत्तरच्या पोटनिवडणुकीतही जयश्री जाधव यांचा अपमान केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी असे वक्तव्य केले आहे. महाडिक यांची पार्श्वभूमी  कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे. गुंडगिरीची भाषा अन या भाषेतून दहशत पसरवणे हा एकमेव अजेंडा या महाडिक कंपनीचा राहिला आहे. परंतु कोल्हापूरची जनता हुशार आहे. असल्या धमकीला आमच्या माता भगिनी घाबरणार नाहीत. घरातले पैसे दिल्यासारखे ते बोलत आहेत. छाती बडवून घ्या असे ते म्हणाले, म्हणजे यांना सुरक्षित महिला नको आहेत. यांच्या मनात महिलांना सुरक्षा द्यायची नाही. त्यांच्या या वक्त्याचा राज्यातील  काँग्रेसजण निषेध करत आहे. महाडिक परजिल्ह्यातील आहेत त्यामुळे शाहू, फुले, आंबेडकर व ताराराणीचा वारसा ते सांगू शकत नाहीत. त्यांना या मातीचा नेमका काय गुण आहे हे माहीत नाही. त्यांच्या या वक्त्याचा जाहीर निषेध करतोअसेकाँग्रेस विधिमंडळ गटनेते सतेज पाटील यांनी सांगितले.

महाडिक यांच्याकडून माफी

दरम्यान हे विधान अंगलट येऊ लागलं खासदार धनंजय महाडिक यांनी माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल, तर त्यांची  माफी मागतो, असे म्हणत पडदा टाकला आहे. माझे हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनीचा अपमान करण्यासाठी मुळीच नव्हते. तर निवडणूक काळात राजकीय प्रचार करताना, विरोधी पक्षाच्या खोट्या प्रचाराला बळी पडनाऱ्या महिलांना, लाडकी बहीण योजना ही फक्त महायुती सरकार मुळेच यशस्वी झाली असल्याचे ठाम पणे नमूद करताना, चुकून आलेली प्रतिक्रिया आहे.

मी माझ्या वैयक्तिक , राजकीय आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलेलो आहे. मी आणि माझ्या पत्नी मार्फत गेली१६ वर्षे भागीरथी  महिला संस्थेमार्फत महिलांच्या आत्मनिर्भरते साठी  नेहमीच सकारात्मक काम करत आलो आहे आणि ह्या पुढे देखील करत राहीन. महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण बाबत, आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. तरीही  माझ्या वक्तव्याने मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, अशी आई अंबाबाईच्या चरणी मी प्रार्थना करतो, असे खासदार धनंजय महाडीक यांनी म्हटले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversial statement of mp dhananjay mahadik on ladki bahin yojana amy