कोल्हापूर : पूर्वीच्या काळात होणारी उद्योगातील गुंतवणूक ही कागदावर असायची. महायुतीच्या काळात देशातील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात होत असून प्रत्यक्ष उद्योग सुरू होऊन रोजगार निर्मिती होत आहे. यामुळे उद्योग आणण्यासाठी गेला होता की, आमदार फोडायला अशा विरोधकांच्या टीकेला कामातूनच उत्तर देऊ, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर त्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
उपमुख्यमंत्री शिंदे हे करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आले होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने यांनी त्यांचे स्वागत केले. महालक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने महायुतीला सत्ता मिळाली आहे. त्यामुळे देवीला नमस्कार करण्यासाठी कोल्हापुरात आलो आहे, असा उल्लेख त्यांनी या वेळी केला.
निवडणूक जिंकल्यानंतर ते आमचे यश आहे असे म्हणायचे. पराभूत झाल्यावर मतदान यंत्र, यादी, निवडणूक आयोग, महायुती यांच्यावर आरोप केले जातात. विरोधकांना आरोप करण्याशिवाय आता काही उरलेले नाही. विरोधी पक्षनेते होण्याइतके आमदार ते निवडून आणू शकले नाहीत. घरी बसवणाऱ्या जनतेने कायम घरी बसवले आहे, असा टोला त्यांनी लगावला. महायुतीने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देत असताना इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला नाही. त्यांच्या योजना पुढेही सुरू राहतील. महाविकास आघाडीच्या काही लोकांनी न्यायालयात जाण्याचा प्रयत्न चालवला आहे, असे शिंदे यांनी एका प्रश्नावेळी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd