कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या कारभारातील गैरव्यवहारप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने चौकशीची मागणी केली असून, सहकार निबंधक यांच्याकडून चौकशी सुरू झाली आहे. ही चौकशी निःपक्ष होऊन भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गोकुळचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे. कार्यकारी संचालकांना सेवेतून मुक्त करावे, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. स्मिता मांढरे सावंत, मनजीत माने उपस्थित होते.
ते म्हणाले, की कोल्हापूर जिल्हा दूध संघात (गोकुळ) सामान्य शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम होणे अपेक्षित आहे. परंतु गोकुळमध्ये पशुखाद्य घोटाळा, सहकुटुंब पंचतारांकित गोवा सहल, जाजम व घड्याळखरेदी, जागाखरेदी, वासाचे दूध या मार्गाने गोकुळच्या हंडीतील लोणी खाण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू असल्यामुळे कष्टकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
या वर्षी गोकुळ दूध उत्पादक संघ संस्थांना घड्याळ व जाजम देण्याकरिता ३ कोटी ७४ लाख रुपयांची खरेदी केली आहे. तीन कोटींपेक्षा अधिक रकमेची खरेदी असेल, तर त्यासाठी निविदा प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना, बगल देऊन स्वतंत्रपणे खरेदी केली आहे. निविदा काढली असती, तर स्पर्धात्मकता होऊन हेच साहित्य स्वस्त मिळाले असते. यामध्ये १ कोटी ८२ लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप करून पवार म्हणाले, ‘शिवसेनेच्या तक्रारीवरून सहकार दुग्ध निबंधक गोसावी यांनी भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली आहे. ही गैरप्रकारे झालेली खरेदी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी रोखणे गरजेचे असताना त्यांनी या प्रकाराला उत्तेजन दिले असल्याने त्यांना सेवेतून मुक्त करण्यात यावे.’
विजय देवणे म्हणाले, ‘पाच वर्षांपूर्वी गोकुळमधील वासाचे दूध हा मुद्दा निकालात काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्ताधारी गटाने त्याला हरताळ फासला आहे. भ्रष्टाचारप्रकरणी संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे.’
मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये पारदर्शक कारभार सुरू असून, त्याला कोणी डाग लावू नये असे विधान केले आहे. त्यावर बोलताना पवार म्हणाले, ‘गोकुळमध्ये शेतकऱ्यांच्या दुधाचे लोणी कोणी मटकावत असेल, तर त्याला मुश्रीफ यांनी शिक्षा का केली नाही. पशुखाद्य घोटाळ्यामध्ये गोकुळमधील पाटील या अधिकाऱ्याला दंड होऊनही सेवेत ठेवले आहे. असे कारभारी गोकुळमध्ये असतील, तर संघासह दूध उत्पादक संघाचेही मोठे नुकसान आहे.
नियमानुसार खरेदीचा गोकुळचा दावा
गोकुळ दूध संघातील जाजम, घड्याळ खरेदी व्यवहाराबाबत उपनिबंधक यांच्याकडून गोकुळकडे पत्र आले होते. त्याचे उत्तर संस्थेने पाठवले आहे. संबंधित खरेदी रीतसर प्रक्रियेने झालेली आहे. संचालक मंडळाने या विषयाला, तसेच खरेदीनंतर कार्योत्तर मंजुरी देण्यात आलेली आहे, असा दावा कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केला आहे.