कोल्हापूर : इचलकरंजीत आयोजित केलेल्या होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत चांदीची गदाही पटकविली. याच जिल्ह्यातील डिग्रज बोट क्लब डिग्रजने दुसरा, कवठेसारच्या युवा शक्ती बोट क्लबने तिसरा आणि डिग्रजच्या जय मल्हार बोट क्लबने चौथा क्रमांक मिळविला. स्पर्धेनंतर आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने मागील ३५ वर्षांपासून पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेतल्या जात आहेत. यंदा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील १० बोट क्लबने सहभाग नोंदविला होता. शर्यतीचा शुभारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली, भाजपा ज्येष्ठ नेते पांडुरंग म्हातुकडे यांच्या हस्ते करण्यात आला.

पाण्याला असलेला वेग, त्यातून शर्यतीमध्ये निर्माण झालेली चुरस पाहून प्रेक्षकांकडून प्रोत्साहन दिले जात होते. नदीच्या दोन्ही काठावर तसेच लहान व मोठ्या पुलावर महिलांसह शर्यतशौकिनांनी गर्दी केली होती. चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे देण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, श्रीरंग खवरे, अमृत भोसले, अनिल कुडचे, शेखर शहा, राजू पुजारी, बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू पाटील, अहमद मुजावर, पापालाल मुजावर, शांताप्पा मगदूम, राहुल घाट, शिवाजी काळे, राजेंद्र बचाटे उपस्थित होते.