कोल्हापूर : इचलकरंजी शहराला मंजुर झालेल्या सुळकुड पाणी योजनेला प्रारंभ व्हावा तसेच शासन आणि विद्यमान लोकप्रतिनिधी यांना जागे करण्यासाठी सोमवारी महाविकास आघाडीच्यावतीने गावभागातील महादेव मंदिरात शंभूमहादेवाला अभिषेक करण्यात आला. इचलकरंजीवासीयांचा पाणी प्रश्न लवकर सुटावा अशी प्रार्थना यावेळी मंदिरात करण्यात आली.  राजवाड्यापासून महादेव मंदिरापर्यंत निघालेल्या या कावड यात्रेत शहरातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

इचलकरंजी शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने सुळकुड योजना मंजुर केली आहे. ही योजना पुर्णत्वास नेण्यासाठी विलंब होत आहे. लोकप्रतिनिधींची अनास्था आणि शासनाचे दुर्लक्ष यामुळे शहरवासियांना दैनंदिन पाणी पुरवठ्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

याप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीने तिसर्‍या श्रावण सोमवारचे औचित्य साधत अनोखे आंदोलन केले. राजवाड्यापासून सुरु झालेल्या या कावड यात्रेत मदन कारंडे, सागर चाळके, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, उदयसिंग पाटील, प्रकाश मोरबाळे, सदा मलाबादे, भरमा कांबळे, संतोष शेळके, बाबासाहेब कोतवाल, राजू आलासे, वसंत कोरवी यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. लोकप्रतिनिधी, शासन यांना सदबुद्धी मिळून इचलकरंजी वासीयांचा पाणी प्रश्न लवकर सुटावा अशी प्रार्थना मंदिरात करण्यात आली. 

इचलकरंजी शहरासाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड नळ पाणी योजना मंजूर झाली आहे. मात्र या योजनेचा शासन स्तरावर पाठपुरावा होत नाही. मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याच्या शब्द उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. अद्यापही बैठक झालेली नाही. तसेच लोकप्रतिनिधींचेही या योजनेकडे दुर्लक्ष आहे, असा आरोप करण्यात आला.

आता नाही तर कधीच नाही, सुळकुड नळ पाणी योजनेचे पाणी मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांचा वाटणीचा एक थेंबही नको पण इचलकरंजीचे पाणी मिळालेच पाहिजे अशा आशयाच्या घोषणा दिल्या जात होत्या. आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवण्याचा निर्यात निर्धार यावेळी करण्यात आला. इचलकरंजीला दूधगंगा नदीतून पाणी देण्यास कागल तालुक्यातून कडाडून विरोध होत आहे. दोन्ही बाजूने होत असलेल्या विरोधामुळे हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं आहे. पाणी मिळण्यासाठी इचलकरंजीमधील नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत, तर पाणी देणार नाही यासाठी कागल तालुक्यातील नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत.