लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : काळम्मावाडी नळ पाणी योजनेचे पाणी मी पालकमंत्री असताना शहरात आले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या पाण्याचे श्रेय कोण्या व्यक्तीचे नाही तर कोल्हापूरच्या जनतेचे आहे. या योजनेसाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी दिल्याने त्यांचे आभार मानले पाहिजेत. कोल्हापूरकरांचे स्वप्न साकारल्यानंतर काळम्मावाडी योजनेचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साजरा करण्यात येणार आहे, असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

काळमावाडी धरणातील नळ पाणी योजनेचे दिवाळीत पाणी येणार असे विधान यापूर्वीच पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले होते. त्यामुळे सणासुदीच्या काळात पाणी आल्याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांनी या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. तसं कोणाला वाटत असेल तर चौकशी करू. या योजनेचे काम निधी अभावी कधीही बंद पडले नाही.

आणखी वाचा-…तर लोकसभा निवडणूक लढवणार नाही; राजू शेट्टींचं आवाडेंना प्रत्युत्तर

श्रेयवादाची किनार

आमची राजकीय भूमिका बदलली आहे. त्यामुळे आम्ही पाणी योजनेचे श्रेय घेऊ असे वाटले असल्याने त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असावा, अशी टीका पालकमंत्री मुश्रीफ यांनी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांना उद्देशून केली.

ठाकरे; जयंतरावांचा समाचार

अजित पवार हात एक बाहेर एक असे वागत नाही,असे म्हणत मुश्रीफ यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये असे छगन भुजबळ यांचे म्हणणे आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर सत्य काय ते समोर येईल, असेही मुश्रीफ म्हणाले. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा आहे. प्रतिज्ञापत्र खरे की खोटी हे बोलण्याचा अधिकार कोणत्याही नेत्याला नाही तर तो निवडणूक आयोगाला आहे, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांना लगावला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration ceremony of kalammawadi water scheme by chief minister eknath shinde says hasan mushrif mrj