कोल्हापूर : करवीर नगरीतील एका तरुणीने अमेरिकेतील महिलांना योगाभ्यासाचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. योग साधनेमुळे प्रशिक्षणार्थींच्या शारीरिक, मानसिक प्रकृतीत फरक पडल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. भारतामध्ये ११ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला. तेव्हापासून योगाचा प्रचार प्रसार सुरू झाला. योगासनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही सुरू झाल्या. शिवाजी विद्यापीठात योग विषयक चार प्रकारचे अभ्यासक्रम डॉ. रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालवले जातात. याच संस्थेमध्ये कोल्हापुरातील दीप्ती पाटील यांनी प्रारंभी योगशिक्षक हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अलीकडेच एमए योगा हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे.

योगशिक्षक झाल्यानंतर त्यांनी कोल्हापुरात योगासनाचे वर्ग सुरू केले. वर्गात निवडक लोकांनाच प्रवेश देण्यावर त्यांचा भर असतो. काही खाजगी ठिकाणीही त्या योगाचे व्यक्तिगत प्रशिक्षण देत असतात. योगासनाची माहिती त्या समाज माध्यमातही अग्रेषित करीत असतात. इंस्टाग्राम वरील त्यांची योगासनांची विषयक माहिती पाहून सहा महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या न्यू जर्सी भागातील ४० वर्षीय सांट्रा यांनी दीप्ती यांच्याशी संपर्क साधून योगासने शिकण्याची इच्छा व्यक्त केली. ३६ वर्षीय दीप्ती यांना पहिल्या विद्यार्थिनी अशाप्रकारे अनपेक्षितरित्या गवसल्या.

सांट्रा यांनी प्रारंभी शारीरिक लवकचितेसाठी योगासने शिकण्याची इच्छा व्यक्त केली. वर्ग सुरू झाल्यानंतर दीप्ती या हळूहळू धडे घेणार्यांशी मैत्री वाढवतात. त्यातून मनाची कवाडे खुली होतात आणि नकळत व्यक्तिगत समस्याही उलगडू लागतात. यातूनच सांट्रा यांना मानसिक त्रास होत असल्याने झोप येत नसल्याचे तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने योगासनाचे धडे दिल्यानंतर मोठा फरक पडल्याचे सांट्रा यांनी नमूद केले आहे.

थोड्या कालावधीनंतर न्यू जर्सी शहरातील सांट्रा कार्यालयीन यांच्या सहकारी हेमा यांनीही ऑनलाईन योगासनाचे वर्ग सुरू केला. मूळच्या भारतीय असलेल्या हेमा या ख्रिस्ती आहेत. श्वासमूलक योगासने, ओमकार साधना यामुळे मानसिक, आध्यात्मिक फायदा झाल्याचा अनुभव हेमा यांनी दीप्ती यांच्याशी बोलताना कथन केला आहे. अलीकडेच अमींडा या ३९ वर्षीय महिलाही दीप्ती यांच्याकडे योगाभ्यासाचे धडे घेऊ लागल्या आहेत.

इचलकरंजीतील शहापूर हायस्कूल आणि वेंकटेश महाविद्यालयात शिक्षण झाल्यानंतर दीप्ती यांनी कोल्हापूर येथे सुरुवातीला नोकरी केली. पुणे येथे असताना अमेरिकेतील एका कंपनीत टीम लीडर म्हणून नियुक्ती झाली होती. याचवेळी त्यांच्या लग्नाच्या हालचाली सुरू होत्या. त्यातून त्यांचा विवाह होवून त्या मुंबईला रवाना झाल्या.

अलीकडे कन्येसह त्या कोल्हापुरात राहत आहेत. पती उद्योजक असले तरी स्वतःचे काही करियर करावे या उद्देशाने त्यांनी योगाकडे लक्ष दिले. इंग्रजी संभाषण कुशलता असल्याने त्यांना सांट्रा यांनी योगासन शिकवण्याविषयी विचारणा केली असता ही संधी दवडायची नाही या उद्देशाने आत्मविश्वासपूर्वक योगासनाचे वर्ग सुरू केले. त्यातून त्यांच्याकडे विद्यार्थी संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे.