कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामांतर करण्यात यावे यासाठी गुरुवारी सायंकाळी येथे हिंदू जनजागृती समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचा अपूर्ण व एकेरी उल्लेख असल्याने अनेक वर्षांपासून शिवभक्त आणि हिंदू संघटनांद्वारे संताप व्यक्त केला जात होता. काही शहरे, रेल्वेस्थानक, विमानतळ आणि अन्य ठिकाणी दिलेली छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची नावे नंतर आदरयुक्त करण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचप्रमाणे, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे आदरयुक्त करण्याची मागणी करीत हिंदू जनजागृती समितीकडून येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करीत राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली. आंदोलनास कालीचरण महाराज, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्‍व हिंदू परिषद, हिंदू महासभा, हिंदू एकता आंदोलन, सनातन संस्था, महाराष्ट्र मंदिर महासंघ, पतित पावन संघटना, बाल हनुमान तरुण मंडळ, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांसह विविध हिंदूत्वनिष्ठ संघटना, तरुण मंडळे यांचे २०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले ‘‘वर्ष १९६२ साली घेतलेला निर्णय अंतिम असू शकत नाही. ६० वर्षांपूर्वीची कारणे आजही ग्राह्य धरता येणार नाहीत. यापूर्वी अनेक ऐतिहासिक संस्थांची नावे सुधारली गेली आहेत. वर्ष १९९६ मध्ये ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ करण्यात आले. नंतर वर्ष २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असा संपूर्ण नावाचा उल्लेख करण्यात आला. तसेच ‘औरंगाबाद’ चे केवळ ‘संभाजीनगर’ नाव न ठेवता ते ‘छत्रपती संभाजीनगर’, अशी नावे बदलण्यात आली आहेत. याच धर्तीवर शिवाजी विद्यापीठाचे नावही ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करणे आवश्यक आहे. असे नामकरण करण्यास जर कोणी विरोध करत असेल, तर ते धक्कादायक आहे. यामुळे दुर्दैवाने शिवाजी विद्यापीठ हे पुरागाम्यांचे अड्डा बनलाय का ? असा प्रश्‍नही या निमित्ताने उपस्थित होतो.

ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव प्रत्येक जण आदराने घेतो त्या छत्रपतींच्या नावाचा एकेरी उल्लेख करून ‘शिवाजी कोण होता ?’, असे कॉ. पानसरे यांचे पुस्तक कसे काय विक्री होते ? त्यामुळे ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाचे नाव त्वरित पालटावे, अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार आहोत. येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हा बदल न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची चेतावणी आम्ही समितीच्या वतीने देत आहोत. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, प्रमोद पाटील, शरद माळी, उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, सुनील सामंत, उमेश नरके,आनंदराव पवळ यांनी मनोगत व्यक्त केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur hindu organizations agitation for rename of shivaji university as chhatrapati shivaji maharaj university css