कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा यासह अन्य मागण्यासाठी आज कोल्हापुरात डाव्या पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या पुतळा दहनाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यावर आंदोलक डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळा दहनावरती ठाम राहिले. ट्रम्प यांच्या पुतळ्याला शेतकऱ्यांच्याकडून जोडे मारण्यात आले. यावरून पोलिस व आंदोलक यांच्यात झटापट झाली. शेवटी आंदोलकांनी बिंदू चौकातील रस्त्यावर येऊन पुतळा जाळला.
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, भारत अमेरिका व्यापार करार रद्द करा, किमान हमी भावाचा कायदा झालाच पाहिजे, डोनाल्ड ट्रम्पचा-नरेंद्र मोदी युतीचा धिक्कार असो, शेतकऱ्यांशी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, ट्रॅक्टरची मुदत पूर्वीप्रमाणे पंधरा वर्षे झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.
राज्य किसान सभेचे राज्य सचिव गिरीश फोंडे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गासारखे प्रकल्पातून शेतकऱ्यांची जमीन ओरबाडून घेतली जात आहे.भारतीय शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी आता देशातील भांडवलदार व आंतरराष्ट्रीय भांडवलदार यांची युती झाली आहे. भारत अमेरिका व्यापारी करारामुळे शेतकरी देशोधडीस लागणार आहे. स्वामीनाथन आयोग व किमान हमीभावाची अंमलबजावणी झालेली नाही. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आज डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याच्या दहनाला पोलिसांच्या मार्फत विरोध करून सरकारने हे दाखवून दिले आहे की त्यांचा सूत्रधार अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प आहे. नोव्हेंबर महिन्यात शेतकरी दिल्लीत घुसून आंदोलन करतील.
बाबासाहेब देवकर म्हणाले,या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी एकजुटीने याला प्रत्युत्तर देतील. सुभाष जाधव म्हणाले मोदी सरकारच्या काळामध्ये शेतकरी कामगारांच्या वरती अन्यायात वाढ झाली आहे. आज शेतकऱ्यांच्या वर होणाऱ्या अन्यायाला कामगार संघटनांनी देखील विरोध केला आहे.
सागर कोंडेकर म्हणाले,किमान हमीभावाचा कायदा व शेतकऱ्यांना कर्जमाफी सरकार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन करतील. सरकार नमले नाही तर हद्दपार करू. रघुनाथ कांबळे,रवी जाधव, दिलीप पवार, विवेक गोडसे, प्रकाश जाधव यांची भाषणे झाली. यावेळी अजित पवार, अमोल नाईक, सागर कोंडेकर, नामदेव पाटील, सुभाष जाधव, दिलीप पवार, बाबुराव कदम,रवी जाधव, सदाशिव निकम,प्रकाश पाटील, कृष्णात पाटील, युवराज शेटे, गुंडू दळवी,शिवाजी कांबळे, केशव राऊत,, प्रकाश जाधव, प्रशांत आंबी, वाय एन पाटील,युवराज पाटील, तानाजी भोसले, जे.एन. पाटील,अशोक पाटील, बाळासाहेब पाटील या सह शेतकरी उपस्थित होते.