कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला हात घातला आहे. निवडणुका कधी होणार याकडे लक्ष ठेवून राहिलेल्या शहरातील तसेच ग्रामीण शहरातील कार्यकर्त्यांना महापालिका,नगरपालिकेत प्रतिनिधित्व करण्याचे तर ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समितीत नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने चेहरे उजळले आहेत.कोल्हापूर महापालिकेची मुदत संपून पाच वर्षाचा कालावधी झाला आहे. यानंतर निवडणुका चार महिन्यांनी होणार, सहा महिन्यांनी होणार असे म्हणत इच्छुक कार्यकर्ते तयारी – प्रतीक्षा करीत राहिले.
चेहरे उजळले
कधी प्रभाग रचना तर कधी ओबीसी आरक्षण अशा मुद्द्यावरून प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने कार्यकर्तेही निवडणुक विषयावर बोलण्याचेही टाळू लागले होते. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले.
महायुती – माविआत सामना
कोल्हापूर जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत. स्थानिक नेत्यांनी याबाबत आज लोकसत्ताशी बोलताना याबाबत मत व्यक्त केले.
प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया
महायुतीचा झेंडा – हसन मुश्रीफ
लोकसभा, विधानसभा निवडणूक याच पद्धतीने लढली गेली होती. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात शक्यतो महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातील. अडचण असतील तेथे स्वतंत्रपणे लढले जाईल. तथापि ओळापूर- इचलकरंजी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका येथे महायुतीची सत्ता आली पाहिजे असे धोरण असणार आहे.
भाजप जिंकणार – धनंजय महाडिक
खासदार धनंजय महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला सर्व दहा जागांवर यश मिळवल्याने त्याच पद्धतीने महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका महायुती एकत्रित निवडणूक लढवावी अशी भूमिका आहे. महायुतीच्या वरिष्ठाच्या सूचनेनुसार निवडणूक लढवली जाणार असली तरी कोल्हापुरात भाजपची निवडणुक लढवण्याची तयारी पूर्ण झाली आहे.
मविआतर्फे लढावे – संजय पवार
उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आजच मुंबईत पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठक झाल्याचा संदर्भ देऊन पुढील बैठक १७ मे रोजी होणार आहे. त्यावेळी निवडणुकीच्या कामांची जबाबदारी वाटून दिली जाणार आहे. कोल्हापुर जिल्ह्यात भाजप -शिंदे गटाचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढली जावी अशी व्यक्तिगत भूमिका आहे. पक्ष नेत्यांचा आदेश अंतिम मांडला जाईल. शिवसेना निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे.
काँग्रेस सज्ज सतेज पाटील
कोल्हापूर महापालिकेत पाच वर्षे प्रशासकराज असल्याने लोकशाही प्रक्रिया ठप्प आहे. आता नव्या नेतृत्वाच्या उदयास संधी मिळणार आहे. प्रशासकीय यंत्रणांमार्फत लोककल्याणकारी योजना, नागरी सेवा पुरवण्यात सातत्याचा अभाव आहे. लोकशाही मूल्यांची पुन:र्स्थापना करणारा आणि संविधानिक रचनेचा गौरव अबाधित राखणाऱ्या या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी म्हंटले आहे.