कोल्हापूर : कोल्हापूर शहरालगतच्या गावांचा समाविष्ट करून हद्दवाढ करावी ही आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे. तथापि कोल्हापुरातील काही लोकप्रतिनिधी हद्दवाढीच्या आडवे येत आहेत, असा गौप्यस्फोट वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ते म्हणाले, शासन पातळीवर हद्दवाढीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितल्यावर प्रस्तावित गावातील नागरिक आंदोलन करतात. हद्दवाढ होण्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. मी व आमदर राजेश क्षीरसागर नगर विकास तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून हद्दवाढ लवकर करण्याची मागणी करणार आहोत.

छावा चित्रपटाच्या बाबत ते म्हणाले, या चित्रपटाविषयी मंत्री उदय सामंत, संभाजीराजे यांनी काही मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात इतिहासाला काही अनुरूप नसेल तर त्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे.

वाशिमचे पालकमंत्री असतानाही ध्वजारोहण केल्यानंतर मुश्रीफ लगेचच कोल्हापुरात परतले. याबद्दल विचारले असता ते म्हणाले, पालकमंत्री पदावर नाराज असण्याचा प्रश्न नाही. आमचे नेते अजित पवार यांच्याकडे यापूर्वी मत व्यक्त केले आहे. वाशिमला ध्वजारोहण केले त्या दिवशी शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने बैठक घेतली नाही. पुन्हा जाईन तेव्हा बैठक घेईन.

कोल्हापूर हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक – प्रकाश आबिटकर

कोल्हापूर : कोल्हापूर हद्दवाढीबाबत महायुती शासन सकारात्मक निर्णय घेईल. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत सकारात्मक आहेत. स्थानिक पातळीवर हद्दवाढीस अंतर्गत विरोध होत आहे. याबाबत येत्या आठ दिवसांत सर्व लोकप्रतिनिधींची व्यापक बैठक घेण्यात येईल, असे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय कृती समिती व कोल्हापूर हद्दवाढ कृती समिती यांच्या वतीने हद्दवाढीबाबत शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

बैठकीवेळी कृती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, क्रेडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई, कॉमन मॅन संघटनेचे अध्यक्ष वकील बाबा इंदुलकर, दिलीप पवार, अशोक भंडारी, किशोर घाटगे, पद्मा तिवले आदींनी हद्दवाढीची मागणी ५० वर्षे होत असताना केवळ बैठका आणि प्रस्ताव जात असल्याबद्दल टीका व्यक्त केली. हद्दवाढ करायची नसेल तर कोल्हापूर महापालिकाऐवजी नगरपालिका करून टाका, असे म्हणत त्रागा व्यक्त करण्यात आला. सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेवर टीका व्यक्त करण्यात आली. महापालिकेच्या प्रशासक के. मंजू लक्ष्मी यांनी लोकसंख्या वाढली असताना हद्दवाढ झाली नसल्याने महापालिकेवर ताण येत असल्याचे नमूद केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public representatives coming against the extension of kolhapur boundaries says minister hasan mushrif zws