संजय राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. या विधानानंतर शिंदे-भाजपाने आक्रमक भूमिका घेत राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, या विधानाबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच विरोधकांच्या हक्कभंगाच्या कारवाईच्या मागणीबाबतही त्यांनी भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – संजय राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्याची भाजपाची मागणी, विधानसभा अध्यक्षांना दिलं पत्र; विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणं भोवणार?

काय म्हणाले संजय राऊत?

“मी काय म्हणालो होतो, हे समजून घेतलं पाहिजे. विरोधकांना देशद्रोही म्हटलं जातं. ज्याप्रकारे शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून काही लोक विधिमंडळामध्ये गेले. त्यांनी सरकार स्थापन केलं आणि आमच्यावर ते हल्ले करत आहेत. विधिमंडळाबाहेर त्यांचा उल्लेख चोर, दरोडेखोर केला जातो. ही लोकभावना आहे. त्यांना उद्देशून मी ते विधान केलं होते. खरं तर माझ्यामुळे नाही तर या लोकांमुळे आज विधिमंडळाची बदनामी होत आहे”, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.

हेही वाचा – “राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ”; संजय राऊतांचं शिंदे-भाजपा सरकारवर टीकास्र; म्हणाले, “सरकार बदलताच २८ चोरांना…”

हक्कभंगाच्या मागणीवर राऊतांची प्रतिक्रिया

पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या हक्कभंगाच्या मागणीबाबतही प्रतिक्रिया दिली. “माझ्या विरोधात जर हक्कभंग आणण्यात आला, तर त्यावर चर्चा होईल, मी माझं म्हणणं तिथे मांडेल. मी तुरुंग गेलेला माणूस आहे, त्यामुळे हक्कभंगाच्या कारवाईला मी घाबरत नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटींचा ठेका, आदित्य ठाकरेंनी तर…”, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

“ही भूमिका त्यांच्या विरोधात होती”

“माझी ही भूमिका त्यांच्या विरोधात होती, ज्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला, ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न चोरण्याचा प्रयत्न केला. मुळात हा विषय त्यांच्या पुरता मर्यादीत आहे. त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मी त्यांच्या विषयी ते विधान केलं होते. ज्या विधिमंडळाने मला राज्यसभेत पाठवलं, ज्या विधिमंडळाने शिवसेनेला सत्ता दिली. त्या विधिमंडळाविषयी माझ्या भावना अत्यंत बहुमोल आहेत”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – नागपूरमधील गडकरींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात कोलदांडा कोणाचा?

“हा महत्त्वाच्या मुद्द्यांवरू लक्ष हटवण्याचा प्रयत्न”

“यासंदर्भात माझी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. मी विधिमंडळाचा अपमान केला नाही. मला तो अपमान करायचाही नाही. मला या सभागृहाचं महत्त्व माहिती आहे. पण गेल्या सहा महिन्यापासून हे सभागृह चोरमंडळाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवरून जनतेचं लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे”, असा आरोपही त्यांनी केला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut clarification after statement on vidhimandal also react on rights infringement action demand spb