India vs Oman, Playing 11 Prediction: आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. पाहिल्या सामन्यात यूएई आणि दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. यासह स्पर्धेतील सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे. भारताचा पुढील सामना ओमानविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो.

भारतीय संघाने आधीच सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापकांकडून प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. माध्यमातील वृत्तानुसार , भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये ३ मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

प्लेइंग ११ मध्ये होणार ३ मोठे बदल

ओमानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरमध्ये बदल केला जाऊ शकतो. रिंकू सिंगला फलंदाजीत आपली जादू दाखवण्याची संधी दिली जाऊ शकते. जर रिंकू सिंगला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली, बाहेर कोणाला बसवलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्शदीप सिंगला प्लेइंग ११ मध्ये संधी देण्यात आलेली नाही. त्याला ओमानविरुद्धच्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. अर्शदीप विकेट्सची शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. या सामन्यात तो हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

यासह वेगवान गोलंदाज हर्षित राणाला देखील प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. त्याला संधी देण्यासाठी शिवम दुबेला विश्रांती दिली जाऊ शकते. ओमानविरूद्ध होणारा सामना हा भारतीय संघासाठी फार महत्वाचा नसणार आहे. कारण भारतीय संघाने आधीच सुपर ४ फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे बाकावर असलेल्या खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्याची संधी असणार आहे.

ओमानविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन, तिलक वर्मा/रिंकू सिंग, हर्षित राणा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिं, वरुण चक्रवर्ती.