दुबई : आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांत माफक आव्हानांचा पाठलाग करणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा आज, शुक्रवारी अबू धाबी येथे होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात ओमानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याच्या प्रयत्न असेल.

भारताने यापूर्वीच ‘अव्वल चार’ फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. या फेरीत रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजांना ओमानविरुद्ध सरावाची चांगली संधी असेल. भारताने याआधी संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तानला पराभूत केले. दोन्ही सामन्यांत भारताने छोट्या आव्हानांचा सहज पाठलाग केला होता. अभिषेक शर्माने अपेक्षेनुसार वेगवान सुरुवात केली. मात्र, शुभमन गिलला खेळपट्टीवर फार वेळ टिकता आले नाही. कर्णधार सूर्यकुमारने पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली आणि त्याला तिलक वर्माची साथ मिळाली. शिवम दुबेने स्पर्धेत केवळ सात चेंडू खेळले असून हार्दिक पंड्या, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना अद्याप फलंदाजीची संधीच मिळालेली नाही. त्यामुळे स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यापूर्वी सर्वच फलंदाजांना लय मिळवून देण्याचा संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न असेल.

ओमानने प्रथम फलंदाजी केल्यास भारतीय गोलंदाजीसमोर त्यांची कसोटी लागेल. कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीसारख्या गोलंदाजांसमोर धावा करणे त्यांना अवघड जाईल. पाकिस्तान आणि अमिरातीविरुद्धही त्यांच्या फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. हम्माद मिर्झाने पाकिस्तानविरुद्ध २७, तर आर्यन बिश्तने अमिरातीविरुद्ध २४ धावांची खेळी केली होती. अन्य फलंदाज मात्र अपयशी ठरले आहेत. आता भारताविरुद्धही त्यांना झगडावे लागू शकेल.

बुमराला विश्रांती?

‘अव्वल चार’ फेरीपूर्वी भारतीय संघ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्यापैकी एकाला स्पर्धेतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळू शकेल. भारतीय संघ स्पर्धेत हा एकमेव सामना अबू धाबी येथे खेळणार आहे. दुबईहून अबू धाबीला जाण्यास दोन तास लागत असल्याने भारतीय संघाने सरावही न करणे पसंत केले.

● वेळ : रात्री ८ वा.

● थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन १,