India vs Pakistan, Playing 11 Prediction: भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. युएईविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ९३ चेंडू शिल्लक ठेवून विजयाची नोंद केली. हा सामना भारतीय संघासाठी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या महत्वाच्या सामन्याआधीचा सराव सामना होता. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. दरम्यान पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल होऊ शकतो.
संजू सॅमसन बाहेर?
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलची जोडी डावाची सुरुवात करताना दिसून आली होती. ही जोडी पाकिस्तानविरुद्ध देखील डावाची सुरुवात करू शकते. या दोघांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. या सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाली होती. पण त्याला मधल्या फळीत स्थान दिलं गेलं होतं. या सामन्यात त्याला फलंदाजीला येण्याची संधी मिळाली नव्हती.
पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात जितेश शर्माला संधी दिली जाऊ शकते. कारण भारतीय संघाला अशा फलंदाजाची गरज आहे, जो शेवटी फलंदाजीला येऊन मोठे फटके खेळू शकतो. जितेश शर्मा आल्याने मधली फळी आणखी मजबूत होऊ शकते. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या आणि जितेश शर्मा हे मधल्या फळीत फलंदाजी करताना मोठे फटके खेळू शकतात.
अर्शदीप सिंगला संधी मिळणार?
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ एकमेव वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरला होता. जसप्रीत बुमराहला साथ देण्यासाठी हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अर्शदीप सिंगला संधी दिली जाऊ शकते. अर्शदीप सिंग हा भारतीय संघासाठी टी – २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
शुबमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव ( कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जितेश शर्मा ( यष्टिरक्षक), कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह,वरुण चक्रवर्ती.