संदीप द्विवेदी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी अक्षर पटेल लोकप्रिय गुजराती कॉमेडी कार्यक्रम ‘लावारी’ मध्ये सहभागी झाला होता. अक्षरबरोबर मंचावर काही विनोदी स्किट सादर करणारे कलावंत होते. त्यांच्याबरोबर तो गुजरातीत बोलत होता. नाडियाडचा मुलगा घरच्या मैदानावर असल्याप्रमाणे त्या कार्यक्रमात वावरत होता. मूळ आणि अस्सल अक्षर पटेल खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमात पाहायला मिळाला.

विनोदाची नर्मविनोदी शैली आणि आणि दडपणाच्या प्रसंगी संयम बाळगत परिस्थिती हाताळण्याचं त्याचं कौशल्य उपस्थितांना जाणवलं. अक्षरने टी२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये खेळलेल्या अफलातून इनिंग्जविषयी बोलावं असं सगळ्यांना वाटत होतं. फायनलमध्ये भारताची स्थिती ३४/3 अशी होती. अक्षरला फलंदाजीत बढती देण्यात आली आणि त्याने ३१ चेंडूत ४७ धावांची अतिशय मोलाची खेळी केली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या दुसऱ्या वनडेतही अक्षरने अशाच स्वरुपाची खेळी केली. विराट कोहली आणि शुबमन गिल झटपट माघारी परतल्यानंतर संकटमोचक अक्षरने ४१ चेंडूत ४४ धावांची खेळी करत डावाला आकार दिला. लावारी कार्यक्रमात अक्षरने कारकिर्दीतल्या सगळ्यात दडपणाच्या सामन्यात नेमकं काय झालं होतं हे उलगडलं. हार्दिक पंड्याने गुजराती भाषेत शेवटच्या क्षणी त्याला काय सल्ला दिला ते सांगितलं. तणावाच्या स्थितीतही तो शांत राहून कसे निर्णय घेतो याविषयी सांगितलं.

धमाल मस्ती स्वरुपाच्या या कार्यक्रमात अक्षरने आयुष्यातल्या अनोख्या अनुभवाविषयी सांगितलं. अक्षरचा मुलगा ८ महिन्यांचा आहे. त्याला पहिल्यांदा पाहिल्यावर कसं वाटलं यावर अक्षरने दिलेलं उत्तर स्मरणात राहावं असं. ‘वर्ल्डकप जिंकणं हा कारर्किर्दीतला सर्वोत्तम क्षण होता. पण मी जेव्हा माझ्या मुलाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मनात आलं, बाकी गयू तेल लेवा. बाकी सगळं गेलं तेल लावत, आता हाच माझं सर्वस्व आहे’, असं अक्षरने दिलेल्या उत्तराचं स्वैर भाषांतर आहे.

अक्षर पटेल दशकभरापेक्षा जास्त काळ भारतासाठी खेळतो आहे. नियमितपणे आयपीएल खेळतो आहे. लोक त्याला ओळखतात. तो घराबाहेर पडला की चाहते स्वाक्षऱ्यांसाठी, फोटोसाठी गर्दी करतात. पण जाहिरातविश्व, मार्केट या जगापासून अक्षर अजूनही दूरच आहे. खेळ आता फक्त करमणुकीचं साधन राहिलेलं नाही. खेळांवर एक मोठं अर्थकारण बेतलं आहे. खेळाची लोकप्रियता वाढवण्यात खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे. विराट कोहली, रोहित शर्मा ही त्याची काही उत्तम उदाहरणं. या दोघांनी १५ वर्ष सातत्याने भारतासाठी दमदार प्रदर्शन केलं. यातूनच त्यांचं नाव ब्रँड झालं. अक्षर पटेल विकेट टू विकेट गोलंदाजी करतो. अफलातून क्षेत्ररक्षक आहे. अतिशय परिपक्व फलंदाजी करतो. पण तो ब्रँड झाला आहे का? का तोही रवींद्र जडेजाप्रमाणेच ब्रँडच्या शर्यतीत मागेच राहील. जडेजाचं भारतीय क्रिकेटला योगदान अतुलनीय असं आहे पण ब्रँड-मार्केट यांच्या चर्चेत तो मागेच आहे.

अक्षरसारखे सगळं काही करू शकणारे खेळाडू उपयुक्त गटात मोडतात. पण दमदार खेळ असूनही त्यांना म्हणावी तशी लोकप्रियता मिळत नाही, त्यांची फार चर्चाही होत नाही. बॉय नेक्स्ट डोअर या इमेजमध्येच त्याला ठेवलं जातं. तो स्टार होत नाही. रोको अर्थात रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडगोळीला मिळालेलं नाव. ते कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यांच्या खेळाची चर्चा होणं साहजिक. पण मैदानाबाहेरच्या त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. सोशल मीडियावर त्यांचे व्हीडिओ व्हायरल होतात, त्याच्या बातम्या होतात. अक्षरसारखे खेळाडू ज्यांच्याकडे एक्स फॅक्टर आहे ते मागेच राहतात.

टी२० वर्ल्डकपमधल्या त्या खेळीविषयी बोलताना अक्षरने त्याच्या तयारीविषयी सांगितलं. भारताची फलंदाजी असताना अक्षर डगआऊटमध्ये का दिसत नाही याबद्दलही त्याने सांगितलं. अक्षर अलीकडे कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला येतो. संघाची जशी गरज असेल तसा त्याचा क्रमांक ठरतो. अक्षरने सांगितलं की तो पहिली ओव्हर पाहतो. त्यातून खेळपट्टीचा नूर लक्षात येतो. त्यानंतर तो ड्रेसिंगरुममध्ये असतो. बाकी फलंदाज कसे खेळत आहेत याचा परिणाम तो आपल्या फलंदाजीवर होऊ देत नाही. अक्षर त्याचं कारणही सांगतो. तो म्हणतो, ‘मी मॅच पाहून स्वत:ला ताण देऊ इच्छित नाही. कारण मला कधीही फलंदाजीला जावं लागतं. मी स्वत:ला शांत ठेवतो. बाकी फलंदाज कसे खेळत आहेत हे मी पाहत बसलो तर त्याच विचारात राहीन. त्यांची आणि माझी शैली वेगळी आहे’.

टी२० वर्ल्डकपच्या फायनलला अक्षरने पहिली ओव्हर पाहिली आणि तो ड्रेसिंगरुममध्ये परतला. थोड्याच वेळात रोहित शर्मा बाद होऊन तंबूत परतला. पाठोपाठ ऋषभ पंतही माघारी परतून आला. रोहितने अक्षरला खेळायला जाण्यास तय्यार राहायला सांगितलं. अक्षरने तयारीला सुरुवात केली. तोवर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही तसाच संदेश पाठवला. ड्रेसिंगरुममधून बाहेर पडेपर्यंत सूर्यकुमार यादवही बाद होऊन परत आला. लगेचच अक्षर खेळायला उतरला. त्याचवेळी गुजराती भाषा बोलणारा एक आवाज त्याने ऐकला. तो हार्दिक पंड्या होता. त्याने अक्षरला जाता जाता महत्त्वाचा सल्ला दिला. हार्दिक म्हणाला, ‘कोई टेन्शन ना लेतो. बिंधास रमजे, तने लगे तू मारी देजे, बस रमजे शांती थी’.(दडपण घेऊ नकोस, मोकळेपणाने खेळ. फटके खेळण्यासाठी चेंडू मिळालाय असं वाटलं तर जरूर फटका मार. शांत मनाने खेळ)

अक्षरने खेळपट्टीवर दाखल होताच दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाचा सामना केला. हार्दिकने दिलेला सल्ला मानावा का अशी स्थिती आली. रबाडाने टाकलेला चेंडू लेगस्टंपच्या दिशेने होता. अक्षरने तो चेंडू तटवून चौकार वसूल केला. पुढे जे घडलं तो इतिहास आपण सारेच जाणतो असं अँकरने म्हटलं. अक्षरने त्यादिवशी परिस्थितीनुरुप खेळ केला आणि भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडिया संकटात असताना अक्षर तारणहाण होऊन संकटातून बाहेर काढतो. नाडियाडचा जयसूर्या ही त्याची ओळख आजही दोस्तांमध्ये कायम आहे. तो आजही दोस्तांबरोबर चहाच्या टपरीवर जातो. दोस्तांसाठीचा अक्षर बदललेला नाही.

अक्षर त्यांना सांगतो, तुम्हाला मला शिव्या द्यायच्या असतील तर बिनधास्त द्या. माझ्याशी वागणं बदलू नका. काही दिवसांपूर्वी अक्षर असाच दोस्तांना भेटायला पोहोचला. त्याच्या हातावर रोलेक्सचं घड्याळ होतं. एका मित्राने त्यावरून त्याला छेडलं. माझ्याही घड्याळात १२ वाजले आहेत, तुझ्याही घड्याळात तेवढेच वाजले आहेत. दोघेही मनापासून हसले.

अक्षर आता भारतीय संघाकडून खेळतो. स्टार झाला पण त्याच्या वागण्यात जराही बदल झालेला नाही असं त्याचे मित्र सांगतात.

अक्षरकडे उपजतच आत्मविश्वास आहे. त्याची झलक लावारी कार्यक्रमात पाहायला मिळाली. आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याचा अनुभव कसा आहे असा प्रश्न अक्षरला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, उत्तम अनुभव आहे. त्यांनी माझ्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तुझा आवडता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कोण आहे? या प्रश्नावर अक्षर म्हणाला, ‘अक्षर पटेल नावाचा एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे’, असं हसतहसत त्याने सांगितलं. अक्षरला संघातलं स्वत:चं स्थान माहिती आहे. कर्णधारपद व्यवस्थापनाने ठोस विचारातून सोपवलं आहे हेही माहिती आहे. त्याला स्वत:चा खेळ आवडतो.

लोकांना काय संदेश देशील असं कार्यक्रमात विचारण्यात आलं. अक्षरने त्यालाही मनापासून उत्तर दिलं. ‘मेहनतीचं महत्त्व, स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवणं आणि बाकी कुणाच्या बोलण्याचा परिणाम होऊ न देणं महत्त्वाचं आहे’, असं अक्षरने सांगितलं. ‘जेव्हा तुम्ही बाकीचे काय करत आहेत हे पाहत बसता तेव्हा तुम्ही फार काही करत नाही असं वाटू लागतं. कोणाचा तरी भव्य महाल उभा राहतोय म्हणून तुम्ही तुमचं घर कशाला तोडायला घेताय’? अशा आशयाची म्हण अक्षरने कार्यक्रमात सांगितली.

कार्यक्रम संपता संपता तो मनापासून हसला आणि प्रेक्षकांनीही त्याच्या हसण्याला दाद दिली. भारतीय संघाने अशा अष्टपैलू खेळाडूंना हेरून त्यांना ठोस स्थान द्यायला हवं. युटिलिटी क्रिकेटर्स एवढ्यापुरतं त्यांना मर्यादित ठेऊ नये. भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघातलं स्टार कल्चर मोडीत काढू असं म्हटलं होतं. मैदानावरची कामगिरी आणि लोकप्रियता यांचा मेळ घातला जातो का हे पाहणं उत्सुकतेचं आहे. क्रिकेटच्या विपणनकारांनी जे खळखळून हसतात आणि उत्तम विनोद करतात त्यांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.