Prasidh Krishna Injury: येत्या काही दिवसात भारतीय संघ वेस्टइंडिजविरूद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबरला रंगणार आहे. या मालिकेसाठी वेस्टइंडिजचा संघ जाहीर करण्यात आला आहे. तर लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं.

वेस्टइंडिजविरूद्ध होणाऱ्या मालिकेआधी भारतीय अ संघ ऑस्ट्रेलिया अ संघाचा सामना करत आहे. भारतीय अ संघात अनेक स्टार खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. या सामन्यात फलंदाजी करता असताना प्रसिध कृष्णाच्या डोक्याला चेंडू लागला. त्यावेळी फिजिओ मैदानात आले आणि त्याला चेक केलं. त्यामुळे काही वेळासाठी सामना थांबवण्यात आला होता. हेल्मेटला चेंडू लागल्यानंतरही त्याने फलंदाजी करणं सुरू ठेवलं होतं. त्याच्या काही वेळानंतर त्याच्या जागी कन्क्शन सब्स्टीट्यूट म्हणून यश ठाकूर फलंदाजीला आला.

नेमकं काय घडलं?

भारतीय अ संघाची फलंदाजी सुरू असताना, ऑस्ट्रेलिया अ संघाकडून ३९ वे षटक टाकण्यासाठी हेन्री थॉर्नटन गोलंदाजीला आला. या डावात भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. त्यामुळे प्रसिध कृष्णावर शक्य तितक्या अधिक धावा करण्याची जबाबदारी होती. यादरम्यान हेन्री थॉर्नटनने टाकलेला चेंडू प्रसिध कृष्णाच्या हेल्मेटला जाऊन लागला. फिजिओने चेक केल्यानंतर त्याने काही वेळ फलंदाजी करणं सुरू ठेवलं. पण वेदना होऊ लागल्याने त्याने रिटायर्ड हर्ट होऊन त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.

वेस्टइंडिजविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी प्रसिध कृष्णाला भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्याला वेस्टइंडिजविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पण तो पूर्णपणे फिट आहे का?हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला संधी दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासह मोहम्मद सिराज आणि आकाशदीपला देखील संधी दिली जाऊ शकते.