मुंबई : मायभूमीवर खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अजिंक्य भारतीय संघाने विश्वविजयाच्या आशा उंचावल्या आहेत. मात्र, विश्वचषक २०१९ प्रमाणेच यंदाही भारतासमोर उपांत्य लढतीत न्यूझीलंडचे आव्हान आहे. गेल्या खेपेला न्यूझीलंडच्या संघानेच भारतचा विजयरथ रोखला होता. मुंबईत येत्या बुधवारी होत असलेल्या सामन्यात त्या पराभवाचा वचपा काढून विश्वविजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा भारताचा प्रयत्न राहील. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोक्याच्या सामन्यात गळपटणारे अर्थात ‘चोकर्स’ हा शिक्का पुसून काढण्याची भारताला सुसंधी आहे.
योगायोगाची बाब म्हणजे, भारताआधी ज्यांना ‘चोकर्स’ म्हणून संबोधले जायचे, त्या दक्षिण आफ्रिका संघानेही यंदा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. त्यांचा उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाशी गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी होत आहे. ऑस्ट्रेलियासमोर महत्त्वाच्या सामन्यांमध्ये नांगी टाकण्याची दक्षिण आफ्रिकेची परंपराच आहे! त्यांनाही हा समज समूळ खोडून काढण्याची संधी आहे. कारण या स्पर्धेतील आतापर्यंतचे दोन सर्वोत्तम संघ भारत आणि दक्षिण आफ्रिका हेच आहेत. या दोहोंमध्ये झालेल्या साखळी लढतीत अपेक्षांचा विचका झाला. एकतर्फी लढतीत भारताने मोठा विजय मिळवला. पण याच दोन संघांमध्ये अंतिम सामना सर्वाधिक रंगेल असेही बोलले जाते.
टी-२० विश्वचषक २०१४, २०१६ आणि २०२२; कसोटी अजिंक्यपद २०२१ आणि २०२३; एकदिवसीय विश्वचषक २०१५, २०१९; चँपियन्स करंडक २०१७ या स्पर्धामध्ये उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत भारतीय संघ पराभूत झाला. म्हणजे गेल्या नऊ वर्षांत आठ स्पर्धा. जेतेपदांचे हे दुष्काळपर्व यंदा तरी संपणार का, या प्रश्नाचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळेल. कदाचित या एका अजिंक्यपदाने पुढे अधिक सातत्याने भारतीय संघ जिंकू शकेल.
विश्वचषकातील कामगिरी
एकूण सामने : ९
’भारत : ४ विजय
’न्यूझीलंड : ५ विजय
(२०१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून भारत पराभूत)
एकूण सामने : ६
(एक सामना अनिर्णित)
’ऑस्ट्रेलिया : ३ विजय
’दक्षिण आफ्रिका : २ विजय
(१९९९ विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिका पराभूत)
