पीटीआय, नवी दिल्ली
भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला केवळ दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी वेळापत्रकाबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे. सलग दोन दिवस सामन्यांचे आयोजन करणे अडचणीचे ठरले असे हैदराबाद क्रिकेट संघटनेचे (एचसीए) म्हणणे आहे. हैदराबाद पोलिसांनी पूर्ण क्षमतेने सुरक्षा पुरवण्यास समस्या येऊ शकेल असे म्हटले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) वेळापत्रकात पुन्हा बदल करावा लागू शकेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे होणारा सामना १५ ऐवजी १४ ऑक्टोबरला खेळवण्याचा निर्णय झाल्यानंतर अन्य सामन्यांच्या वेळापत्रकातही बदल करावा लागला होता. नव्या वेळापत्रकानुसार, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील हैदराबाद येथे होणारा सामना १२ ऐवजी १० ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. हैदराबादला ९ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड-नेदरलँड्स सामन्याच्या आयोजनाचीही जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे हैदराबादला ९ आणि १० ऑक्टोबर असे सलग दोन दिवशी सामने होणार आहेत.
‘‘वेळापत्रकात पुन्हा बदल होईलच असे सांगणे अवघड असले, तरी सलग दोन दिवशी सामन्यांचे आयोजन करणे सोपे नाही. ‘बीसीसीआय’ने याबाबत विचार केल्यास ते आमच्यासाठी सोयीचे ठरेल. आम्हाला सुरक्षा पुरवणाऱ्या संस्थांचाही विचार करावा लागणार आहे. विश्वचषकाच्या दोन सामन्यांमध्ये किमान एक दिवसाचा कालावधी असायला हवा. आम्ही पोलिसांशी चर्चा करत आहोत आणि याबाबत ‘बीसीसीआय’लाही सातत्याने माहिती देत आहोत,’’ असे ‘एचसीए’च्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी हैदराबाद पोलिसांकडून दोन ते अडीच हजार अधिकारी पुरवले जातात. त्यातच सलग दोन दिवशी होणाऱ्या सामन्यांपैकी एकात पाकिस्तानचा सहभाग असल्याने सुरक्षा अधिक वाढवावी लागू शकेल आणि हे हैदराबाद पोलिसांसाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. विश्वचषकाच्या सामन्यांची तिकीट विक्री २५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे वेळापत्रकात पुन्हा बदल करायचा झाल्यास, त्यासाठी ‘बीसीसीआय’कडे फारसा वेळ नाही.
आशिया चषकासाठी आज संघनिवड
आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारताची संघनिवड सोमवारी होणे अपेक्षित आहे. भारताचा १७ सदस्यीय संघ निवडला जाणार असून केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांची निवड होणार की नाही, याकडे सर्वाचे लक्ष असेल. राहुल आणि श्रेयस यांच्यावर अनुक्रमे मांडी आणि पाठीच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ते सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत कसून सराव करत आहेत. आशिया चषक स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.
विश्वचषकासाठी हैदराबाद केंद्राची जबाबदारी माझ्यावर आहे. तेथील सामन्यांच्या आयोजनात कोणतीही अडचण असल्यास ती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल करणे सोपे नाही आणि होण्याची शक्यताही फार कमी आहे. वेळापत्रकात बदल करण्याचा अधिकार केवळ ‘बीसीसीआय’ला नाही. आम्हाला सहभागी संघ आणि ‘आयसीसी’लाही याबाबत विचारावे लागते. – राजीव शुक्ला, ‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष