Shubman Gill, IND vs AUS Adelaide Viral Video : ऑस्ट्रेलियातील रस्त्यांवर फिरणारा भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलबरोबर एक पाकिस्तानी चाहता उद्धटपणे वागल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून समाजमाध्यमांवर या पाकिस्तानी चाहत्याबाबत संताप निर्माण झाला आहे. हा पाकिस्तानी चाहता शुभमन गिलजवळ आला, त्याने शुभमनबरोबर हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. शुभमननेही आपला हात पुढे करून त्याच्याशी हस्तांदोलन केलं. त्याचवेळी त्या पाकिस्तानी चाहत्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा दिली. मात्र, यावर शुभमन गिल कोणतीही प्रतिक्रिया न देता ना पुढे निघून गेला.

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. भारत व ऑस्ट्रेलिया संघात मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. दरम्यान, बुधवारी संघातील खेळाडू सराव सत्र संपवून हॉटेलमधून बाहेर पडले. शुभमन गिल अ‍ॅडलेडमध्ये फिरत असताना एका पाकिस्तानी चाहत्याने त्याच्याबरोबर उद्धट कृत्य केलं. मात्र, यावर शुभमन गिलने शांत राहात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शुभमनच्या या कृतीचं कौतुक होत आहे.

शुभमन गिलच्या कृतीचं कौतुक

पाकिस्तानी चाहत्याने गिलला डिवचण्याचा प्रयत्न केला तरी गिलने त्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याने शांतं राहाणं पसंत केलं. त्याच्या या कृतीतून त्याने दाखवून दिलं की तो मैदानात असो अथवा मैदानाबाहेर, तो अशा प्रसंगी शांतं राहाणं पसंत करतो.

कर्णधार म्हणून गिलचा संघर्ष

शुभमन गिलकडे भारतीय कसोटी संघाचं पूर्णवेळ कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. तसेच त्याने टी-२० संघाचं नेतृत्व केलं आहे. यासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याची पहिल्यांदाच भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. मात्र, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधील कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात गिलला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरा एकदिवसीय सामना

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात कांगारूंच्या संघाने भारताचा सात गडी व ४.३ षटकं राखून दारूण पराभव केला होता. भारतासाठी आता दुसरा सामना जिंकणं गरजेचं आहे. आज (२३ ऑक्टोबर) उभय संघांमध्ये दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. अ‍ॅडलेडच्या मैदानात भारत व ऑस्ट्रेलियाचे संघ एकमेकांशी दोन हात करतील. या सामन्यात दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली व रोहित शर्मा या दोघांच्या कामगिरीकडे संपूर्ण जगभरातील क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.

अ‍ॅडलेडमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील भारताची संभाव्य प्लेइंग ११

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज.