Gautam Gambhir’s reaction to Jasprit Bumrah ruled out Champions Trophy 2025 : जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने मंगळवारी याची पुष्टी केली. बुमराहच्या पाठीला दुखापत झाली आहे. सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली. बुमराहच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी, यशस्वी जैस्वालच्या जागी वरुण चक्रवर्ती संघात आला आहे. यावर भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी सांगितले की एनसीएच्या वैद्यकीय पथकाने बुमराहच्या प्रकृतीबद्दल अपडेट द्यावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतम गंभीर बुमराहच्या दुखापतीबद्दल काय म्हणाला?

भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीरने आता या मुद्द्यावर आपले मौन सोडले आहे. तथापि, त्याने दुखापतीबद्दल आणि बुमराहच्या पुनरागमनाबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. तो सामन्यानंतर म्हणाला, “अर्थातच तो बाहेर आहे. पण मी तुम्हाला सर्व तपशील देऊ शकत नाही. कारण तो किती काळ बाहेर राहील हे वैद्यकीय पथकाने ठरवायचे आहे आणि त्याबद्दल बोलायचे आहे. कारण एनसीएमध्ये निर्णय घेणारे वैद्यकीय पथक आहे.”

‘तो एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे’ –

गौतम गंभीर पुढे म्हणाला, “निश्चितच आम्हाला तो संघात हवा होता. तो काय करू शकतो हे आम्हाला माहिती आहे, तो एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. पण मग, काही गोष्टी तुमच्या हातात नसतात. त्यामुळे हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग सारख्या तरुण खेळाडूंसाठी ही एक संधी आहे. कधीकधी या अशा संधी असतात ज्या तुम्ही शोधत असता. संपूर्ण मालिकेत हर्षितने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने काही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीप काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. बुमराहची उणीव जाणवेल. पण मोहम्मद शमीसारखा अनुभवी खेळाडू परत येणे नेहमीच चांगले असते.”

भारताने इंग्लंडला दिला क्लिन स्वीप –

बुधवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १४२ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असा विजय मिळवला. भारताने शुबमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडला ३५७ धावांचे लक्ष्य दिले होते. सलामीवीर शुबमन गिलने १०२ चेंडूत ११२ धावांची शानदार खेळी साकारली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली. फिल साल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ६.२ षटकांत ६० धावांची भागीदारी केली. यानंतर, इंग्लंडच्या विकेट नियमित अंतराने पडत राहिल्या आणि संपूर्ण संघ ३४.२ षटकांत २१४ धावांवर गारद झाला.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam gambhir breaks silence on jasprit bumrah ruled out of champions trophy 2025 says but all the details vbm