कोषाध्यक्षपदासाठी देशपांडे आणि खांडवाला यांच्यात थेट लढत
कायमस्वरूपी वास्तव्याच्या मुद्दय़ावरून भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा उमेदवारी अर्ज मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) शुक्रवारी अवैध ठरवला होता. मंगळवारी मुंडे यांच्या वकिलाने एमसीए कार्यालयात जाऊन या निर्णयाविरोधात दाद मागितली आहे. एमसीएचे विद्यमान अध्यक्ष म्हणून रवी सावंत आता मुंडे यांच्याबाबतचा निर्णय बुधवारी दुपारी घेणार आहेत.
कायमस्वरूपी वास्तव्याच्या ज्या मुद्दय़ावरून दोन वर्षांपूर्वी शरद पवार यांना एमसीएची निवडणूक लढवता आली नव्हती, त्याच नियमाचा अडथळा या वेळी मुंडे यांना आला आहे. शुक्रवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी याच मुद्दय़ावरून मुंडे यांचा अर्ज अवैध ठरवला. परंतु मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मुंडे यांच्या वकिलाने आयकर विवरण पत्र, पॅन कार्ड आणि पासपोर्ट यांचे पुरावे एमसीएकडे सादर केल्या. आता बुधवारी सावंत मुंडेंबाबतचा निर्णय घेतील.
एमसीएच्या कार्यकारिणी समितीच्या १८ ऑक्टोबरला होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी १७ जागांकरिता ४० (मुंडेंशिवाय) उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २१ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत.
उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी विजय पाटील, रवी सावंत आणि पंकज ठाकूर अशी तिरंगी लढत आहे. तथापि, विनोद देशपांडे, रवी मांद्रेकर, संजय पाटील, लालचंद रजपूत, शेखर शेट्टी यांनी माघार घेतली आहे. कोषाध्यक्षपदाच्या एक जागेसाठी विनोद देशपांडे आणि मयांक खांडवाला यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रवीण बर्वे, रवी मांद्रेकर आणि रवी सावंत यांचे अर्ज मागे घेण्यात आले आहेत. याचप्रमाणे संयुक्त सचिवपदाच्या दोन महत्त्वाच्या जागांकरिता पी. व्ही. शेट्टी, नितीन दलाल, उन्मेश खानविलकर आणि प्रवीण बर्वे यांच्यात चौरंगी लढत असेल. विनोद देशपांडे, अ‍ॅबी कुरुविल्ला, नदीम मेमन, लालचंद रजपूत, अतुल रानडे, शाहआलम शेख यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

गरवारे प्रकरण मार्गी लावण्याचे पवारांचे आश्वासन- रवी सावंत
‘‘मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अखत्यारीत वर्षभरात सुमारे १०७ स्पर्धा होतात. या स्पर्धाच्या कार्यक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. याचप्रमाणे हंगामाच्या आरंभीच आम्ही संपूर्ण स्पर्धाचा कार्यक्रम जाहीर केला. याशिवाय प्रत्येक सामन्याच्या कामगिरीचा लेखाजोखा राखणारे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या माध्यमाने प्रत्येक सामन्यानंतर निवड समितीपर्यंत या सामन्याचा अहवाल पोहोचतो. त्यामुळे निवड समिती सदस्यही आनंदी आहेत,’’ अशा शब्दांत एमसीएचे विद्यमान अध्यक्ष रवी सावंत यांनी आपल्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेतला.
कांदिवली येथे सोमवारी रात्री बाळ म्हाडदळकर गटाची पहिली प्रचारसभा मोठय़ा उत्साहात पार पाडली. पवारांच्या वतीने राज्यमंत्री सचिन अहिर या कार्यक्रमाला उपस्थित होते. अहिर यांनी आपल्या भाषणात पवारांचे राजकारण आणि क्रिकेट याबाबत गुणगान गायले. या वेळी सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘‘पंच, सांख्यिकी, सामनाधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होतात. अशी रचना करण्यात आली आहे. याचप्रमाणे महिलांच्या क्रिकेटच्या विकासासाठी आम्ही योजना आखणार आहोत. मैदानावर त्यांच्या सामन्यांसाठी योग्य व्यवस्था करण्यात येईल.’’
एमसीए आणि गरवारे क्लबचा वाद मुंबई क्रिकेटसाठी नवा नाही. याविषयी सावंत म्हणाले की, ‘‘हा वाद बराच काळ प्रलंबित आहे. परंतु निवडणूक संपताच हे प्रकरण मार्गी लावू, असे आश्वासन पवार यांनी आम्हाला दिले आहे.’’

अध्यक्ष (१)
शरद पवार १

उपाध्यक्ष (२)
विजय पाटील, रवी सावंत,
पंकज ठाकूर ३

कोषाध्यक्ष (१)
मयांक खांडवाला, विनोद देशपांडे २

संयुक्त सचिव (२)
उमेश खानविलकर, पी. व्ही. शेट्टी, नितीन दलाल, प्रवीण बर्वे,  ४

कार्यकारिणी सदस्य (११)
अ‍ॅबी कुरुविल्ला, लालचंद रजपूत, अतुल रानडे, विजय शिर्के, आशीष पाटणकर,  नदीम मेमन, इक्बाल शेख,
संगम लाड, कौशिक गोडबोले,
अ‍ॅड. शेखर शेट्टी, लालजी जोशी,
दीपक पाटील, अरविंद कदम, श्रीकांत तिगडी, गणेश अय्यर, राजन फातफेकर, संजय पाटील, रमेश वाजगे, दीपक मूरकर, नवीन शेट्टी, अरमान मलिक, शिरीष मल्लापुरकर, परवेझ चौधरी, अभिजित घोष, प्रवीण गोगरी,  दाऊद पटेल, प्रसून रक्षित, दीपक राणे, अजय सेठ, शाह आलम शेख  ३०