एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने उदयोन्मुख खेळाडूंना स्वप्न पाहणे कधीच थांबवू नका, नशीब तुम्हाला कधी कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही, असा सल्ला दिला.
‘बीसीसीआय’ने प्रसिद्ध केलेल्या एका ध्वनिचित्रफीत संदेशामधून तिने आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना मोठी स्वप्न बघा आणि ती सत्यात उतरविण्यासाठी मेहनत करा असे म्हटले आहे.
‘‘मी लहान असल्यापासून हातात बॅट घेऊन फिरायचे. माझ्या वडिलांच्या मोठ्या बॅटने मी कायम खेळायचे. एके दिवशी वडिलांनी त्यांच्या जुन्या बॅटमधून माझ्यासाठी एक छोटी बॅट करून घेतली. त्यानंतर कायम माझ्या हातात ती बॅट राहिली आणि मोठ्या मैदानावर उतरण्याचे स्वप्न बघायला सुरुवात केली,’’ असे हरमनप्रीत म्हणाली.
‘‘लहानपणापासूनच क्रिकेट खेळायचे स्वप्न बघायला सुरुवात केली तेव्हा दूरचित्रवाणीतून अनेक सामने बघितले. आपल्यालाही अशीच संधी मिळायला हवी असे वाटायचे. महिला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नव्हती. पण, वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे लहानपणापासून सुरू झालेला माझ्या स्वप्नाचा प्रवास आज विश्वचषक विजेतेपदापर्यंत येऊन थांबला. हा प्रवास सोपा नव्हता. पण, उद्दिष्टापर्र्यंतच पोहचण्याची जिद्द आणि त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी दाखवल्यामुळे हे सहज शक्य झाले,’’ असेही हरमनप्रीतने सांगितले.
त्यामुळेच हे विजेतेपद केवळ प्रेरणा न मानता मोठी स्वप्ने पाहा. कितीही अडथळे आले तरी स्वप्नांपासून ढळू नका. नशीब तुम्हाला कधी कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. स्वत:वर विश्वास ठेवा तो असेल, तर सर्वकाही शक्य होते. माझ्याबाबतीतही असेच घडले, असे हरमनप्रीत म्हणाली.
विश्वविजेतेपद एखाद्या जादूसारखे वाटत आहे. देवाने आम्हाला सर्व काही दिले. हे एकदम कसे घडले हे समजत नाही, पण, आम्ही आज विश्वविजेतेपदाच्या क्षणात जगत आहोत, असे हरमनप्रीत म्हणाली.
लंडनमध्ये २०१७ मध्ये विश्वचषक अंतिम सामन्यात झालेला पराभव आणि त्यानंतरही भारतात झालेले आमचे भव्य स्वागत हे सगळे महिला क्रिकेटसाठी प्रेरणादायी होते. प्रत्येक जण महिला क्रिकेटसाठी आणि देशासाठी काहीतरी खास करण्याची वाट पाहत होता. संघातील प्रत्येक खेळाडू, संपूर्ण स्टेडियम आणि सामना पाहणारे देशवासीय सर्वजण जिंकण्यासाठी जणू एकत्र आले होते. या सर्वांमुळे हे शक्य झाले. एकट्याने हे शक्य नव्हते, असेही हरमनप्रीतने सांगितले.
देशातील प्रत्येक जण या क्षणाची वाट पाहत होता. २०१७ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत होऊनही मायदेशात झालेल्या स्वागतावरून हे जाणवत होते. या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रार्थनेमुळेच आम्ही विजेतेपदाची रेषा ओलांडू शकलो. – हरमनप्रीत कौर, भारतीय महिला संघाची कर्णधार.
