Harshit Rana concussion controversy in Pune T20I : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामन्यात हर्षित राणाला कनक्शन सबस्टिट्यूट म्हणून खेळण्याची संधी मिळाली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पदार्पण होते. भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात अष्टपैलू शिवम दुबेच्या हेल्मेटला चेंडू लागला, ज्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी आला नाही. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा कनक्शन सबस्टिट्यूट म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला. त्याने मैदानात सामन्यात कलाटणी दिली आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कनक्शन सबस्टिट्यूटवरुन नवा वाद पेटला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हर्षित राणाने घेतल्या तीन विकेट्स –

हर्षित राणा हा भारताच्या विजयाच्या नायकांपैकी एक होता. तो १२व्या षटकात गोलंदाजी करायला आला आणि त्याने दुसऱ्याच चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनला बाद केले. यानंतर त्याने स्फोटक फलंदाज जेकब बेथेललाही बाद केले. हॅरी ब्रूकने एका वेळी राणाच्या लागोपाठ तीन चेंडूंवर १६ धावा निश्चित केल्या होत्या, पण त्याशिवाय त्याने फलंदाजांना एकही संधी दिली नाही. राणाने १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जिमी ओव्हरटनला बाद करून भारताचा विजय निश्चित केला. त्याने ४ षटकात ३३ धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या.

‘लाईक टू लाईक’ रिप्लेसमेंटचा आहे नियम –

कनक्शन सबस्टिट्यूटबद्दल आयसीसीचा नियम असा आहे की, फक्त ‘लाईक टू लाईक’ रिप्लेसमेंट उपलब्ध असतो. म्हणजे ज्या प्रकारचा खेळाडू बाहेर गेला आहे, तशाच प्रकारचा खेळाडू संघात त्याची जागा घेऊ शकतो. शिवम दुबे हा अष्टपैलू फलंदाज आहे, जो अधूनमधून गोलंदाजी करतो. दुसरीकडे, हर्षित राणा वेगवान गोलंदाज आहे. याच कारणामुळे भारताच्या विजयानंतर वाद सुरू झाला आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने एक्सवर लिहिले की, ‘अर्धवेळ गोलंदाजी करणाऱ्या फलंदाजाची जागा स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजी कशी घेऊ शकतो?’ त्याचबरोबर इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूक म्हणाला, ‘शिवम दुबेच्या जागी त्यांनी हर्षित राणाला कनक्शन सबस्टिट्यूट म्हणून कशी परवानगी दिली? हे मला समजत नाही.’

शिवम दुबे कधी-कधी करतो गोलंदाजी –

शिवम दुबे हा टी-२० विश्वचषक २०२४ च्या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. या काळात त्याने अमेरिकेविरुद्ध फक्त एकच षटक टाकले होते. आयपीएल २०२४ च्या १४ सामन्यांतही त्याने फक्त एकच षटक टाकले होते. हर्षित राणाच्या नावावर आतापर्यंत २५ टी-२० सामन्यांमध्ये केवळ दोन धावा आहेत. या कालावधीत त्याने २८ विकेट्स घेतल्या आहेत. दुबेने १५३ सामन्यांच्या टी-२० कारकिर्दीत १९१ षटके टाकली आहेत. राणाने 25 सामन्यात ७४ षटके गोलंदाजी केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshit rana concussion controversy in ind vs eng 4th t20i at pune after india beat england by15 runs vbm