Amanjot Kaur Gave Her World Cup Winning Medal To Pratika Rawal: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जेतेपदाचा मान पटकावला. भारतीय महिला संघाला याआधी वर्ल्डकपची एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. त्यामुळे भारतीय संघासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यादरम्यान मोदींनी खेळाडूंसोबत फोटोशूट केलं. या फोटोशूटसाठी प्रतिका रावळ देखील उपस्थित होती.

वर्ल्डकप २०२५ स्पर्धेसाठी प्रतिका रावळची भारतीय महिला संघात निवड झाली होती. सलामीला फलंदाजी करताना तिने दमदार सुरूवात करून दिली होती. प्रतिका ही या स्पर्धेत भारतीय संघासाठी दुसरी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. तर स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी चौथी फलंदाज ठरली. मात्र सेमीफायनल सामन्याआधी झालेल्या, साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे संघाबाहेर व्हावं लागलं. तिच्या जागी शफाली वर्माची संघात निवड करण्यात आली.

बांगलादेशविरूद्ध झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला मैदान सोडावं लागलं. दुखापत गंभीर असल्यामुळे तिला संघाबाहेर करून शफाली वर्माला संघात स्थान दिलं गेलं होतं. त्यामुळे प्रतिकाला वर्ल्डकप विनिंग मेडल दिलं गेलं नव्हतं. प्रतिकाला मेडल न दिलं गेल्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी अशी मागणी केली आहे, ती दुखापतीमुळे बाहेर होऊन सुद्धा तिला मेडल मिळायला हवं होतं. पण नियमानुसार असं होऊ शकत नाही. आयसीसीच्या नियमानुसार, जे खेळाडू संघाचा अधिकृत भाग आहेत अशाच खेळाडूंना मेडल दिलं जातं. दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यामुळे तिच्या बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली होती.

अमनजोत कौरची मन जिंकणारी कृती

नरेंद्र मोदींसोबत झालेल्या फोटोशूटवेळी प्रतिका रावळ देखील उपस्थित होती. भारतीय खेळाडूंनी ब्लेजर परिधान केलं होतं. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या हातात वर्ल्डकपची ट्रॉफी होती. तर सर्व खेळाडूंनी वर्ल्डकप विनिंग मेडल देखील गळ्यात घातलं होतं. प्रतिका रावळला वर्ल्डकप विनिंग मेडल दिलं गेलेलं नाही. पण अमनजोत कौरने आपलं मेडल प्रतिकाला दिलं. अमनजोत कौरच्या या कृतीचं जोरदार कौतुक होत आहे.हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.