Tilak Varma big jump in ICC T20 rankings : भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जात आहे. दरम्यान, आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळच्या टी-२० क्रमवारीत अनेक उलथापालथ दिसून येत आहेत. विशेषत: टीम इंडियाचा स्टार फलंदाज तिलक वर्माने इतिहास घडवला आहे. त्याने एका स्थानाने झेप घेतली असून, यासह त्याने आता दुसरे स्थान पटकावले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीसी टी-२० क्रमवारीत ट्रॅव्हिस हेड अव्वल –

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत ट्रॅव्हिस हेड पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग सध्या ८५५ आहे. दरम्यान, तिलक वर्मा एका स्थानावर झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता थेट ८३२ पॉइंट पर्यंत वाढले आहेत. तिलक वर्मा प्रथमच आयसीसी टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यानंतर त्याने ८४४ ची रेटिंग मिळवले होते, पण तिसऱ्या सामन्यात स्वस्तात बाद झाल्याचा त्याला फटका बसला. असे असूनही तो आता ट्रॅव्हिस हेडच्या अगदी जवळ आला आहे.

सूर्या आणि बटलरच्या क्रमवारीत कोणताही बदल नाही –

दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत आपल्या बॅटने चांगली कामगिरी करू न शकलेला इंग्लंडचा सलामीचा फलंदाज फिल सॉल्टला एका स्थानाचा फटका बसला आहे. तो आता ७८२ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. सध्या, टॉप-५ मध्ये हा एकमेव बदल आहे, परंतु तो खूप मोठा आहे. दरम्यान, भारताचा सूर्यकुमार यादव ७६३ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. जोस बटलर ७४९ रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर कायम आहे. यानंतर बाबर आझम सहाव्या तर पथुम निसांका सातव्या क्रमांकावर आहे.

मोहम्मद रिझवानला फायदा तर, यशस्वी जैस्वालला तोटा –

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला न खेळता एका स्थानाचा फायदा झाला आहे, तर भारताचा यशस्वी जैस्वालही खेळला नाही, मात्र तो एका स्थानाने घसरला आहे. मोहम्मद रिझवान ७०४ रेटिंगसह ८ व्या क्रमांकावर तर यशस्वी जैस्वाल ६८५ रेटिंगसह ९व्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा कुशल परेरा ६७५ रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर कायम आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc t20 latest rankings announce tilak varma big jump in his t20 career rankings vbm