Ayush Mhatre Century In England: भारताचा १९ वर्षांखालील संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय १९ वर्षांखालील संघ आणि इंग्लंडचा १९ वर्षांखालील संघात ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने बाजी मारली. आता दोन्ही संघांमध्ये पहिल्या ४ दिवसीय कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यात भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने दमदार शतकी खेळी केली आहे.
भारताचा संघ देखील इंग्लंड दौऱ्याव आहे. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करताना केएल राहुलने दमदार शतकी खेळी केली. केएल राहुलने शतक झळकावल्यानंतर, इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्ध खेळताना आयुष म्हात्रेने देखील शतक झळकावलं आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून वैभव सूर्यवंशीने १३ चेंडूत अवघ्या १४ धावांची खेळी केली. वैभव स्वस्तात माघारी परतला, पण त्यानंतर आलेल्या विहान मल्होत्राने वैभवसोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी १७३ धावा जोडल्या.
भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने जवळपास ९० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. यादरम्यान तो नियंत्रणात फलंदाजी करताना दिसून आला. मात्र, त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने संधीचा फायदा घेत मोठे फटके देखील मारले. त्याने पहिल्या डावातील १६ व्या षटकात इंग्लंडचा गोलंदाज जेम्स मिंटोच्या षटकात २ षटकार मारले. आयुषने या डावात १०७ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं.
केएल राहुल शतक झळकावल्यानंतर लगेच बाद होऊन माघारी परतला. असच काहीसं आयुष म्हात्रेसोबत देखील घडलं. आयुषने ३६ व्या षटकात आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर ३८ व्या षटकात तो बाद होऊन माघारी परतला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर आर्ची वॉनने त्याला बाद करत माघारी धाडलं. आयुषने ११५ चेंडूंचा सामना करत १०२ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने १४ चौकार आणि २ षटकार मारले.
आयुष देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचं प्रतिनिधित्व करतो. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी त्याचा चेन्नई सुपर किंग्ज संघात समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत त्याला ७ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने २४० धावा केल्या होत्या.