IND vs AUS 3rd T20I Highlights: भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील तिसरा सामना आज खेळवला जात आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेत १-० ने पुढे आहे. तर आज तिसरा सामना मालिका निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. तिसरा सामना ओव्हलच्या मैदानावर खेळवला जात आहे.

वॉशिंग्टन सुंदर नाबाद ४९; टीम इंडिया विजयी

वॉशिंग्टन सुंदरच्या ४९ धावांच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात ५ विकेट्सनी विजय मिळवला. सुंदरने २३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४९ धावांची खेळी केली. जानेवारी २०२४ नंतर संघात संधी मिळालेल्या जितेश शर्माने १३ चेंडूत नाबाद २२ धावांची खेळी करत वॉशिंग्टनला चांगली साथ दिली.

तिलक वर्मा आऊट

झेव्हियर बार्टलेटच्या बॉलिंगवर तिलक वर्माचा विकेटकीपर जोश इंगलिसने चांगला कॅच घेतला. त्याने २९ धावा केल्या.

वॉशिंग्टन-तिलक स्थिर

वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा जोडीने चौकार-षटकार आणि एकेरी दुहेरी धावा यांचा सुरेख मिलाफ साध्य केला आहे.

अक्षर पटेलही आऊट

नॅथन एलिसने चांगला मारा कायम राखत अक्षर पटेललाही तंबूत पाठवलं आहे. झेव्हियर बार्टलेटने त्याचा चांगला कॅच टिपला.

फसव्या स्लोअरवनवर सूर्यकुमार आऊट

सातत्याने स्लोअरवन टाकणाऱ्या मार्कस स्टॉइनसने भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला आऊट केलं. सूर्यकुमारने ११ चेंडूत २४ धावांची खेळी केली.

शुबमन गिलचा संघर्ष सुरूच

टी२० प्रकारात धावांसाठी झगडणाऱ्या शुबमन गिल या सामन्यातही मोठी खेळी करता आली नाही. नॅथन एलिसच्या यॉर्करवर तो एलबीडब्ल्यू झाला.

अभिषेक शर्माची चांगली सुरुवात पण गमावली विकेट

चांगल्या फटकेबाजीसह सुरुवात करणाऱ्या अभिषेक शर्माचा नॅथन एलिसच्या उसळत्या चेंडूवर पूलचा प्रयत्न फसला. त्याने २५ धावा केल्या.

डेव्हिड-स्टॉइनसची अर्धशतकं, ऑस्ट्रेलिया १८६

टीम डेव्हिड आणि मार्कस स्टॉइनस यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १८६ धावांची मजल मारली. डेव्हिडने ७४ तर स्टॉइनसने ६४ धावांची खेळी केली. भारतातर्फे अर्शदीप सिंगने ३ तर वरुण चक्रवर्तीने २ विकेट्स पटकावल्या.

मार्कस स्टॉइनसचं अर्धशतक

टीम डेव्हिडच्या फटकेबाजीतून प्रेरणा घेत अनुभवी मार्कस स्टॉइनसने अर्धशतक पूर्ण केलं.

तिलक वर्माचा अफलातून झेल

शिवम दुबेच्या बॉलिंगवर टीम डेव्हिडने आणखी एक षटकार लगावण्याचा प्रयत्न केला मात्र या खेपेस तिलक वर्माने प्रसंगावधान राखत सुरेख कॅच टिपला. डेव्हिडने ३८ चेंडूत ७४ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याने ८ चौकार आणि ५ षटकार लगावले.

वरुण चक्रवर्तीने पटकावल्या दोन चेंडूत दोन विकेट

टीम डेव्हिड सुसाट फटकेबाजी करत असतानाच वरुण चक्रवर्तीने मिचेल मार्श आणि मिच ओवेन यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला.

टीम डेव्हिड सुसाट

तडाखेबंद फटकेबाजीसाठी प्रसिद्ध टीम डेव्हिड चौकार, षटकारांची लयलूट करत २३ चेंडूतच अर्धशतकाला गवसणी घातली.

जोश इंगलिसही तंबूत

खेळपट्टीवर दाखल झाल्यापासून आऊट होण्याचा वारंवार प्रयत्न करणारा जोश इंगलिस अर्शदीप सिंगच्या बॉलिंगवर फाईनलेग क्षेत्रात कॅच देऊन बाद झाला. हर्षित राणाच्या जागी संधी मिळालेल्या अर्शदीपने २ ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवून दिल्या आहेत.

ट्रॅव्हिस हेड माघारी

भारताविरुद्ध नेहमीच दमदार खेळणाऱ्या धोकादायक ट्रॅव्हिस हेडला डावखुऱ्या अर्शदीप सिंगने पहिल्याच ओव्हरमध्ये तंबूत परतावलं. चौकारांसह सुरुवात करणाऱ्या हेडला अर्शदीपच्या चेंडूचा अंदाज आला. मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न सूर्यकुमार यादवच्या हातात जाऊन विसावला.

भारताची प्लेईंग इलेव्हन

शुबमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह</p>

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन

मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन

प्लेईंग इलेव्हन

भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी तीन मोठे बदल केले आहेत. हर्षित राणाच्या जागी अर्शदीप सिंगला संधी दिली आहे. तर संजूच्या जागी जितेश शर्मा व कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये जॉश हेझलवुडच्या जागी शॉन अबॉट खेळणार आहे.

भारताने अखेरीस जिंकली नाणेफेक

भारत आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या सामन्याची नाणेफेक भारतीय संघाने जिंकली आहे. यासह भारताने बऱ्याच नाणेफेक गमावल्यानंतर एकदाची नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ मोठे बदल केले आहेत.