IND vs BAN 1st ODI: Liton Das takes a catch in the air, even Virat Kohli is speechless | Loksatta

IND vs BAN 1st ODI: हवेत सूर मारत लिटन दासने घेतला अफलातून झेल, विराट कोहलीही झाला अवाक्

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. त्याचवेळी लिटन दासच्या उत्कृष्ट झेलने विराट कोहलीच्या खेळीला ब्रेक लावला.

IND vs BAN 1st ODI: हवेत सूर मारत लिटन दासने घेतला अफलातून झेल, विराट कोहलीही झाला अवाक्
सौजन्य- (लोकसत्ता ग्राफिक्स)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ढाका येथे खेळवला जात आहे. यजमान संघाचा नवा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पाहुण्या संघाला धक्के देण्यास सुरुवात केली. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिला सलामीवीर शिखर धवन स्वस्तात परतला, त्यानंतर कर्णधार रोहित शर्माही तंबूत परतला. त्याचबरोबर विराट कोहलीला बाद करण्याचे श्रेय फक्त लिटन दासला जाते.

वास्तविक, रोहित धवन बाद झाल्यानंतर विराट कोहलीवर जबाबदारी आली. मात्र बांगलादेशच्या कर्णधाराने विराटच्या बॅटला ब्रेक लावला. शाकिब अल हसनच्या षटकात विराटने बुलेटच्या वेगाने शानदार शॉट खेळला, तर ऑफ साइडला उभ्या असलेल्या लिटन दासने विजेच्या वेगाने डायव्हिंग करून झेल घेतला. हा अप्रतिम झेल पाहिल्यानंतर माजी कर्णधार विराट कोहलीही हैराण झाला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोहलीची प्रतिक्रिया पाहायला मिळते. भारतीय संघाने आपले तीन महान फलंदाज ५० धावांत गमावले. त्याचवेळी आता श्रेयस अय्यरही २४ धावा करून तंबूत परतला. आता सर्व जबाबदारी केएल राहुलवर आली आहे. बांगलादेशच्या गोलंदाजांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघाला चांगली सुरुवात करून देण्याचे काम केले. भारतीय सलामीवीरांची कामगिरी निराशाजनक ठरली आणि शिखर धवन पुन्हा एकदा फलंदाजीत फ्लॉप ठरला. सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर धवनच्या रूपाने भारतीय संघाला पहिला धक्का बसला. शिखर धवनने १७ चेंडूत ७ धावा केल्या आणि मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाला.

हेही वाचा :   Virendra Sehwag: स्कोअर कार्ड विसरा, सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ओळखा; वीरेंद्र सेहवागचं आवाहन

यानंतर ११व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने भारताने आपली दुसरी विकेट गमावली. रोहित २७ धावा करून शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. रोहित बाद झाल्यानंतर लगेचच विराट कोहलीनेही त्याची विकेट गमावली. १५ चेंडूत ९ धावा करून कोहली झेलबाद झाला. हवेत सूर मारत लिटन दासने कोहलीचा झेल टिपला. लिटन दासच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 14:42 IST
Next Story
IND vs PAK: सचिन तेंडुलकरच्या वादग्रस्त रनआऊटबाबत वसीम अक्रमचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘ब्रेकच्या वेळी…’