IND vs ENG 2nd Test Day 1 Live Updates: भारत वि. इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच २ जुलै पासून खेळवला जात आहे. हा सामना एजबेस्टन बर्मिंगहममध्ये आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवल्यामुळे भारत ०-१ ने मालिकेत पिछाडीवर आहे. भारतीय संघाची नजर मालिकेत बरोबरी साधण्यावर आहे. यासह भारताने पहिल्याच दिवशी चांगला कामगिरी केली आहे आणि ३१० धावांची आघाडी घेतली आहे.

भारताने एजबेस्टन कसोटीच्या पहिल्या दिवशी किती धावा केल्या?

भारताने गिलच्या शतकाच्या जोरावर पहिल्या दिवशी आपला दबदबा राखला आहे. टीम इंडियाचा निम्मा संघ जर तंबूत परतला असला तरी भारताच्या टॉप फलंदाजी फळीने धावांमध्ये मोठं योगदान दिलं आहे. यासह भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ बाद ३१० धावा केल्या आहेत. यासह जडेजा ४१ धावा तर गिल ११४ धावा करत नाबाद परतले आहेत.

कर्णधार गिलचं शतक

भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलने इंग्लंडविरूद्ध सलग दुसऱ्या कसोटीत शतक झळकावलं आहे. गिलने सलग दौन चौकार लगावत आपलं सातवं कसोटी शतक पूर्ण केलं. गिलने १९९ चेंडूत ११ चौकारांसह १०२ धावा केल्या. यासह भारतीय संघाने ३०० धावांचा पल्ला गाठला आहे.

जडेजा गिलची अर्धशतकी भागीदारी

ऋषभ पंत आणि नितीश रेड्डीच्या लागोपाठ विकेटनंतर जडेजा आणि गिलने मिळून संघाचा डाव सावरला आहे. जडेजा आणि गिल ५० अधिक धावांची भागीदारी करत मैदानात कायम आहेत. यासह भारताने २६० धावांचा पल्ला गाठला आहे.

नितीश रेड्डी क्लीन बोल्ड

ख्रिस वोक्स ६२व्या षटकात गोलंदाजीला आला आणि चौथ्या चेंडूवर नितीश रेड्डीला क्लीन बोल्ड केलं. नितीश रेड्डी वोक्सचा चेंडू समजून घेण्यात चुकला आणि त्याने चेंडू सोडला. पण तो चेंडू थेट जाऊन स्टम्पसवर जाऊन आदळला.

ऋषभ पंत झेलबाद

सामन्यातील ६१वे षटक टाकण्यासाठी शोएब बशीर आला. पंतने बशीरच्या गोलंदाजीवर अनेक मोठे फटके खेळत धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे पंत बशीरच्या चेंडूवर मोठा फटका खेळायला गेला, पण जॅक क्रॉली वेळेवर सीमारेषेच्या दिशेने पोहोचत झेल टिपला. यासह भारताने चौथी विकेट गमावली आहे.

शुबमन गिलचं अर्धशतक

भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिल इंग्लंड दौऱ्यावर शानदार फॉर्मात आहेत. त्याने दुसऱ्या कसोटीतही आपला फॉर्म कायम ठेवत पहिल्या डावात शानदार अर्धशतक झळकावलं. १२७ चेंडूत ५ चौकारांसह ५० धावा करत अर्धशतक केलं.

भारताने दुसऱ्या सत्रात किती धावा केल्या?

यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी ५० अधिक धावांची भागीदारी रचक संघाचा डाव १५० च्या पार नेला. पण यानंतर स्टोक्सने जैस्वालला बाद करत तिसरी विकेट मिळवली. यासह भारताने दुसऱ्या सत्रात २८ षटकांमध्ये १ विकेट गमावत ८४ धावा केल्या. आता मैदानावर गिल आणि पंतची जोडी आहे.

यशस्वी जैस्वाल झेलबाद

बेन स्टोक्स ४६व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर जैस्वालला बाद केलं. स्टोक्सने ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला. जैस्वालने हा बाहेर जाणारा चेंडू खेळायला गेला आणि चेंडूने बॅटची कड घेत थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला. स्टोक्सने अखेरीस संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. जैस्वाल १०७ चेंडूत १४ चौकारांसह ८७ धावा करत बाद झाला.

भारताची धावसंख्या १५० पार

भारतीय संघाची धावसंख्या पार पोहोचली आहे. दुसऱ्या सत्रात शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालने चांगली फलंदाजी करत ५० अधिक धावांची भागीदारी रचत संघाची धावसंख्या पुढे नेत आहेत. गिल अर्धशतकाच्या जवळ आणि जैस्वाल शतकाच्या जवळ पोहोचला आहे.

भारताच्या १०० धावा पूर्ण

भारतीय संघाने लंचब्रेकनंतर लगेच १०० धावांचा पल्ला गाठला. जैस्वालने दुसऱ्या सत्रातील पहिल्याच षटकात चौकार लगावत आपला आक्रमक अंदाज कायम असल्याचं दाखवलं. भारताने पहिल्या सत्रात २ विकेट्स गमावले आहेत. यानंतर आता जर पहिल्या डावात भारताला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर दुसऱ्या सत्रात गिल आणि जैस्वालने मोठी भागीदारी रचणं महत्त्वाचं असणार आहे.

लंचब्रेकपर्यंत भारताने किती धावा केल्या?

यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकानंतर ब्रायडन कार्सच्या षटकात करूण नायर स्लिपमध्ये झेलबाद झाला. यासह भारताला पहिल्या सत्रात दुसरा धक्का बसला. करूण नायर ५० चेंडूत ३१ धावा करत बाद झाला. यासह भारताने २५ षटकांत २ विकेट्स गमावत ९८ धावा केल्या आहेत.

यशस्वी जैस्वालचं अर्धशतक

यशस्वी जैस्वालने जोश टंगच्या २२व्या षटकात सलग ३ चौकार लगावत अर्धशतक झळकावलं. जैस्वालने २२व्या षटकानंतर ६१ चेंडूत ११ चौकारांसह ५९ धावा करत खेळत आहे.

करूण नायरची चांगली सुरूवात

पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर करूण नायरने दुसऱ्या कसोटीत चांगली सुरूवात केली. त्याने जोश टंगच्या एका खेळीत सलग दोन चौकार लगावले आहेत.

केएल राहुल क्लीन बोल्ड

आपल्या डावाला सावधतेने सुरूवात करत २५ चेंडूत २ धावा करत खेळताना बाद झाला. नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर वोक्सने टाकलेला चेंडू बॅटला लागून जमिनीवर पडून स्टंप्सवर आदळल्याने क्लीन बोल्ड झाला. यासह ख्रिस वोक्सने इंग्लंडला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे.

भारताच्या डावाला सुरूवात

भारत वि. इंग्लंड एजबेस्टन कसोटीला सुरूवात झाली असून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची जोडी मैदानात आहे. यशस्वीने ४ डॉट बॉलनंतर पहिल्याच षटकात चौकार लगावला. तर केएल राहुल सावधपणे खेळत आहे. इंग्लंड संघाकडूनही भेदक गोलंदाजी पाहायला मिळत आहे. यशस्वीने आतापर्यंत ३ चौकार मारले असून राहुलने १८ चेंडूत १ धाव केली. ७ षटकांनंतर टीम इंडिया बिनबाद १४ धावांवर खेळत आहे.

इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन

भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाल्याचं कर्णधार गिलने सांगितलं आहे. नितीश कुमार रेड्डी, आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदरचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. साई सुदर्शन, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर झाले आहे.

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन

बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

नाणेफेक

इंग्लंडने भारताविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीची नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह भारतीय संघ या सामन्यातही प्रथम फलंदाजी करताना दिसेल. रेकॉर्डनुसार एजबेस्टनच्या मैदानावर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाची जिंकण्याची शक्यता फार आहे.