IND vs ENG 5th Test Day 1 Live Updates in Marathi: भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील अखेरचा आणि पाचवा कसोटी सामना आज ३१ जुलैपासून खेळवला जाणार आहे. हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर आहे. भारतीय संघाने पहिल्या दिवशी ६ बाद २०४ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये करूण नायरने ९ वर्षांनी अर्धशतक झळकावलं आहे आणि संघासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या आहेत. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरसह त्याने अर्धशतकी भागीदारी करत २०० धावांचा पल्ला गाठण्यात दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ख्रिस वोक्सच्या खांद्याला दुखापत

ख्रिस वोक्स जेमी ओव्हरटनच्या ६०व्या षटकात फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली. करूण नायरने खेळलेला चेंडू चौकारासाठी जात असताना वोक्सने डाईव्ह केली आणि सीमारेषेच्या पलीकडे गेला. तितक्यात त्याने खांदा धरला आणि तो प्रचंड वेदनेमध्ये होता. त्यानंतर फिजिओ मैदानात येऊन त्याला तपासलं आणि तो मैदानाबाहेर गेला आहे.

भारताला बसला सहावा धक्का

ध्रुव जुरेल एटकिन्सनच्या षटकातील बाद होण्यापूर्वीच्या चेंडूवर पायचीत झाल्याचं इंग्लंडने अपील केलं होतं. पण त्याने रिव्ह्यू घेतला आणि नाबाद राहिला. यानंतर पुढच्या चेंडूवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्लिपमध्ये झेलबाद झाला. यासह भारताने सहा विकेट्स गमावत १५३ धावा केल्या आहेत.

रवींद्र जडेजा झेलबाद

रवींद्र जडेजाने चांगली सुरूवात आक्रमक फटके खेळले. पण जोश टंगच्या एका भेदक चेंडूवर झेलबाद झाला. चेंडू पडल्यानंतर फिरून आतमध्ये आला आणि बॅटची कड घेत यष्टीरक्षकाच्या हातात गेला. यासह भारताने ५ बाद १२३ धावा केल्या आहेत.

साई सुदर्शन झेलबाद

सतत योग्य लाईन लेंग्थवर गोलंदाजीसाठी धडपडणाऱ्या जोश टंगने साईला चकित करत कमालीचा चेंडू टाकला. या चेंडूवर बचाव करण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची कड घेत विकेटकिपरच्या हातात गेला. यासह साई ३८ धावांवर झेलबाद होत माघारी परतला.

१०० धावा पूर्ण

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पावसाने हजेरी लावलेल्या अखेरच्या कसोटीत भारताने ३५ षटकांत ३ विकेट्स गमावत १०० धावा केल्या आहेत. यासह भारताने १०० धावांचा पल्ला पार केला.

टीब्रेक

पावसामुळे सामना थांबल्यानंतर टीब्रेक घेण्यात आला. यानंतरही ओल्या मैदानामुळे सामना सुरू होण्याला विलंब होत आहे. टीब्रेकनंतर आता पावसाने पुन्हा हजेरी लावली नाही तर सामना ९.१५ वाजता सुरू होईल.

पावसामुळे सामना पुन्हा थांबला

अर्ध्या तासाचा खेळ झाल्यानंतर लंडनमध्ये पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे.त्यामुळे सामना परत एकदा थांबण्यात आला आहे. भारताने तोपर्यंत ३ बाद ८५ धावा केल्या आहेत.

शुबमन गिल रनआऊट

चांगल्या फॉर्मात असलेला आणि सावध फलंदाजी करत धावा करणारा गिल धावबाद झाला. शुबमन गिलने हलक्या हाताने फटका खेळला आणि धाव काढण्यासाठी गेला पण एटकिन्सनच्या रॉकेट थ्रोमुळे धावबाद होत माघारी परतला.

सामन्याला सुरूवात

पावसाच्या उपस्थितीनंतर सामन्याला पुन्हा सुरूवात झाली आहे. साई सुदर्शन आणि शुबमन गिलची जोडी मैदानावर आहे. तर उर्वरित दोन्ही सत्रांच्या सामन्याच्या वेळा बदलल्या आहेत. ७.३० ला सुरू झालेलं दुसरं सत्र ९.३५ पर्यंत खेळवलं जाईल. यानंतर ९.३५ ते ९.५५ टीब्रेक होईल. तर तिसरं सत्र ९.५५ ते ११.३० वाजेपर्यंत खेळवला जाईल. पहिल्या दिवशी अर्धा तास खेळ अधिक होणार आहे.

पावसाची विश्रांती, मैदानाच्या पाहणीनंतर सामना किती वाजता होणार?

लंडनमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून मैदानही खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. ७ वाजता मैदानाची पाहणी केल्यानंतर पाऊस पुन्हा पडला नाही तर खेळ ७.३० वाजता सुरू होईल.

सामना कधी सुरू होणार?

लंचब्रेक झाला असूनही सामना सुरू व्हायला विलंब होत आहे. पावसाने विश्रांती घेतली असून ओल्या आऊटफिल्डमुळे सामना सुरू व्हायला वेळ होत आहे. ६.३० वाजता मैदानाची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. पंचांनी ६.३० वाजता मैदानाची पाहणी केल्यानंतर मैदान खेळण्यासाठी पूर्णपणे तयार नसल्याने पुन्हा अर्ध्या तासाने म्हणजे ७ वाजता मैदानाची पाहणी केली जाणार आहे.

भारत-इंग्लंड पहिल्या दिवसाचा खेळ अचानक थांबवला

केनिंग्टन ओव्हल मैदानावर होत असलेल्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा सामना अचानक थांबवण्यात आला आहे. पाऊससदृश्य परिस्थिती संपूर्ण दिवस सामन्यात राहणार आहे, पण यादरम्यान अचानक जोरदार पावसाला सुरूवात झाली आणि सर्वच जण एकदम धावत पळत मैदानाबाहेर गेले. लंचब्रेकला ८ मिनिटं बाकी असताना पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आता लंचब्रेक लवकर घेण्यात आला आहे. यासह लंचब्रेकपर्यंत भारताने २ विकेट्स गमावत ७२ धावा केल्या आहेत.

केएल राहुल क्लीन बोल्ड

ख्रिस वोक्सला दुसऱ्या एन्डवरून गोलंदाजीला आणण्याचा इंग्लंडचा प्लॅन यशस्वी ठरला आणि ज्याचा भारताला फटका बसला आहे. यासह १६व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कट मारायला गेला आणि राहुल क्लीन बोल्ड झाला आहे. यासह भारताला दुसरा धक्का बसला आहे आणि भारताची सुरूवात २ बाद ३८ अशी आहे.

भारताला पहिला धक्का

इंग्लंडविरूद्ध पाचव्या कसोटीत फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. एटकिन्सनने पाचव्या कसोटीत दुखापतीनंतर पुनरागमन केलं आहे. त्याने स्पेलमधील दुसऱ्या षटकातच संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. एटकिन्सनने योग्य लेंग्थवर गोलंदाजी केली आणि चेंडू त्याच्या दोन्ही पायाच्या पॅडवर आदळला, त्यामुळे पंचांनी बाद दिलं नाही आणि लगेच पोपने रिव्ह्यू घेतला आणि निर्णय यजमानांच्या बाजूने लागला आणि जैस्वाल २ धावा करत बाद झाला.

भारताची पाचव्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज

इंग्लंडची पाचव्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन

जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग

इंग्लंडने सलग पाचव्यांदा जिंकली नाणेफेक

भारत आणि इंग्लंड पाचव्या कसोटीची नाणेफेक इंग्लंडने जिंकली आहे. यासह इंग्लंडने पाचही कसोटी सामन्यांची नाणेफेक जिंकली आहे. यासह इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारताचा संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे. भारताने प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ मोठे बदल केले आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराह पाचवा कसोटी सामना खेळणार नाही, त्याच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी दिली आहे. तर शार्दुल ठाकूरच्या जागी करूण नायर आणि ऋषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेल खेळताना दिसेल.

नाणेफेक उशिराने होणार

भारत आणि इंग्लंड अखेरचा कसोटी सामना आजपासून केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्याची नाणेफेक पावसाच्या उपस्थितीमुळे उशिराने होणार असल्याची माहिती समोर आली आहे. लंडनमध्ये पावसाची चिन्ह असल्याचे वातावरण असणार आहे.

पाचव्या कसोटीपूर्वी संघांना दुखापतींचा धक्का

भारतीय संघाचा उपकर्णधार ऋषभ पंत दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी एन जगदीशन या खेळाडूला संधी मिळाली आहे. तर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स पाचव्या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे इंग्लंडचे नेतृत्त्व ऑली पोप करणार आहे.

भारत-इंग्लंड कसोटी मालिका

भारत आणि इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान संघ आघाडीवर आहे. इंग्लंडने पहिला आणि तिसरा सामना जिंकत मालिकेत आघाडी मिळवली आहे. तर भारताने दुसरा बर्मिंगहममधील सामन्यात विजय मिळवला, तर संघाला तिसऱ्या सामन्यात अनिर्णित ठेवण्यात यश आलं आहे. त्यामुळे २-१ अशा गुणसंख्येवर असलेल्या मालिकेतील पाचव्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत.