Shreyas Iyer expresses disappointment after IND vs ENG 3rd ODI : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारत २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेतील आपल्याला मोहीमेला सुरुवात करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला एक पश्चाताप झाला. खरं तर, बुधवारी भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो शतक झळकावू शकला नाही. तो म्हणाला, मला शतक झळकावता आले असते तर बरे झाले असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या ६४ चेंडूत ७८ धावांच्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. यासह अय्यरने शुबमन गिल (११२) सोबत तिसऱ्या विकेटसाठी १०४ आणि केएल राहुल (४०) सोबत चौथ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. ३५६ धावा केल्यानंतर भारताने इंग्लंडला १४२ धावांनी पराभूत केले. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने इंग्लंडला व्हाईटवॉश दिला.

श्रेयस अय्यर मालिका विजयावर काय म्हणाला?

अहमदाबाद एकदिवसीय सामन्यानंतर अय्यर म्हणाला की, “ही मालिका जिंकल्याने भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लय मिळेल. ड्रेसिंग रूममध्ये उत्साह आहे, खूप ऊर्जा आहे, प्रत्येकजण उत्तम फॉर्ममध्ये आहे, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लयीत आहे. तिन्ही सामन्यांमध्ये तुम्हाला दिसेल की प्रत्येकाने संघाची जबाबदारी कशी घेतली. योग्य वेळी धावा काढणे आणि विकेट घेणे महत्त्वाचे होते. आम्ही यावर खूप काम केले आहे.”

श्रेयस अय्यरने व्यक्त केली खंत –

श्रेयस अय्यर पुढे म्हणाला, “मला शतक करता आले असते, तर बरे झाले असते. पहिल्या सामन्यात मला माझ्या संघाला लय द्यायची होती. मी प्रत्येक चेंडू त्याच्या गुणवत्तेनुसार खेळला. दुसऱ्या सामन्यात मी धावबाद झालो. पण आज शुबमन आणि विराटकडून चांगला प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर मला मोठी साकारण्याची संधी होती.” विराट कोहलीने (५२) गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली.

संपूर्ण मालिकेत श्रेयस अय्यर फॉर्ममध्ये होता. त्याने तीन सामन्यांमध्ये ६०.३३ च्या सरासरीने १८१ धावा केल्या. त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५९ धावा आणि दुसऱ्या सामन्यात ४४ धावा केल्या. अय्यर मालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याच्या पुढे गिल आहे, ज्याने ८६.३३ च्या सरासरीने २५९ धावा केल्या आहेत. गिलला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng i wish i could have shreyas iyer expresses disappointment on missing century ahead of champions trophy 2025 vbm