भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार भारतीय संघाने फलंदाजी करताना, सूर्यकुमार यादवच्या नाबाद शतकाच्या जोरावर ६ बाद १९१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ट्विट करुन सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीचे कौतुक केले आहे.

सूर्याने ४९ चेंडूत शतक पूर्ण केले. २०२२ च्या आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे त्याचे दुसरे शतक आहे. अशाप्रकारे त्याने रोहित शर्माच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. २०१८ मध्ये, रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात २ शतके झळकावली होती. याआधी टी-२० वर्ल्ड कपमध्येही त्याने चांगली कामगिरी करताना २०० हून अधिक धावा केल्या होत्या.

विराट कोहलीने ट्विट केले की, ” न्यूमेरो यूनो दाखवत आहे की तो जगातील सर्वोत्तम का आहे. त्याला लाइव्ह पाहिले नाही. पण मला खात्री आहे की, ही त्याची आणखी एक व्हिडिओ गेम इनिंग होती.”

सूर्यकुमार यादव टी-२० मध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये उत्कृष्ट शतक झळकावले. अशा प्रकारे त्याच्या २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये ११०० धावा पूर्ण झाल्या आहेत. जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला १००० धावाही पूर्ण करता आल्या नाहीत. त्याचबरोबर त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

हेही वाचा – IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमार यादवने शतक झळकावत रोहित शर्माच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी

या सामन्यात प्रथम खेळताना टीम इंडियाने ६ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावांची मोठी धावसंख्या उभारली. सूर्या ५१ चेंडूत १११ धावा करून नाबाद राहिला. त्याने ११ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज टीम साऊदीने २० व्या षटकात हॅट्ट्रिक घेत भारतीय धावसंख्या २०० धावांपर्यंत पोहोचू दिली नाही.