ICC T20 World Cup 2022 IND vs PAK: आयसीसी टी २० विश्वचषकात आज बहुप्रतीक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. दोन्ही देशातील चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. दुपारी १. ३० वाजता हा सामना सुरु होणार असून डिझनी प्लस हॉटस्टार सहित स्टार स्पोर्ट्सच्या वाहिन्यांवर प्रक्षेपित केला जाणार आहे. मागील विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला यानंतर २०२२ च्या आशिया चषकातही निर्णायक क्षणी पाकिस्तानने विजय प्राप्त केला. या दोन्ही पराभवांचा बदला घेण्यासाठी आजचा सामना रोहित शर्माच्या टीम इंडियासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सामना सुरु होण्याआधीच दोन्ही देशातून सोशल मीडियावर एकमेकांना ट्रोल केले जात आहे. अशातच आता पाकिस्तानच्या जर्सीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियममध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तानी जर्सीवर चक्क भारताचा माजी कर्णधार व स्टार खेळाडू विराट कोहली याचे नाव व जर्सी नंबर असलेला फोटो तुफान व्हायरल होत आहे. विराट कोहलीच्या एका फॅनने ही जर्सी घातली होती. हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. जर ही व्यक्ती कोहलीची फॅन आहे तर त्यांनी भारतीय जर्सी घालूनच यायचं होतं असाही सल्ला अनेकांनी या पोस्टवर दिला आहे.

IND vs PAK T20 WC 2022 Weather Updates: ऑस्ट्रेलियाचे हवामान ढगाळ; भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाची कितपत शक्यता?

किंग कोहलीच्या १८ नंबरच्या जर्सीचं क्रेझ जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये आहे. अनेकांनी व्हायरल फोटोवरून या पाकिस्तानी चाहत्याचं कौतुक केलं आहे. दोन्ही देशातील वाद, ट्रोलिंग या सगळ्यात या व्यक्तीने विराट कोहलीला दिलेला हा पाठिंबा हा कोहलीसाठी सर्वात मोठी पोचपावती असल्याचेही अनेकांनी म्हंटले आहे.

विराट कोहलीच्या नावाची पाकिस्तानी जर्सी

दरम्यान, यापूर्वीही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात कोहलीचे पाकिस्तानी चाहते दिसून आले आहेत. जेव्हा मागील काही काळात विराट कोहलीचा फॉर्म बिघडला होता तेव्हाही त्याच्या ट्रोलर्सना भारतातूनच नव्हे तर पाकिस्तानी चाहत्यांकडूनही थेट उत्तर देण्यात आली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak virat kohli name and jersey number on pakistani jersey watch emotional moment in t 20 world cup svs