पीटीआय, कोलकाता
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या (५/२७) भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद मालिकेतील कसोटी सामन्यात शुक्रवारी विद्यामान विजेत्या पाहुण्या दक्षिण आफ्रिकेला १५९ धावांत गुंडाळून पहिला दिवस आपल्या नावावर केला. दिवसअखेरीस भारताने १ बाद ३७ धावांची मजल मारली होती. भारत अजूनही १२२ धावांनी पिछाडीवर आहे. केएल राहुल १३, तर वॉशिंग्टन सुंदर ६ धावांवर खेळत होता. यशस्वी जैस्वालला (१२) मार्को यान्सन याने बाद केले.
सामन्याला सुरुवात होताना भारताने वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव अशा चार फिरकी गोलंदाजांना खेळविण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने एकाहाती दक्षिण आफ्रिकेला गुंडाळले हेच पहिल्या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. डावात पाच गडी बाद करण्याची कामगिरी बुमराने ९६ डावांत सोळाव्यांदा केली.
नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला एडीन मार्करम (३१) आणि रायन रिकल्टन (२३) यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, बुमराच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारताने निर्विवाद वर्चस्व राखले. डावाला सुरुवात केल्यावर पहिल्या दहा षटकांत बिनबाद ५७ धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने पुढील ४५ षटकांत १०२ धावांत आपले सर्व गडी गमावले. त्यांचा डाव केवळ चार तास १३ मिनिटे चालली.
ईडन गार्डन्सवर ३६ हजार प्रेक्षकांच्या उपस्थित खेळायला सुरुवात झाल्यावर खेळपट्टी फिरकीला साथ देण्याचा अंदाज चुकला आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्टीर वेगवान गोलंदाजांनी आपले वर्चस्व राखले. दिवसाच्या अखेरीस प्रकाश कमी होत असतानाच दक्षिण आफ्रिकेने फलंदाजांजवळ क्षेत्ररचना ठेवत राहुल आणि सुंदर जोडीवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. पण, दोघांनीही अत्यंत शांत फलंदाजी करत भारताचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.
त्यापूर्वी, मार्करम आणि रिकल्टन यांची सुरुवात संथ आणि आव्हानात्मक राहिली. बुमरा आणि मोहम्मद सिराज यांनी अनेकदा या दोन्ही फलंदाजांच्या कौशल्याची कसोटी पाहिली. मार्करमला तर खाते उघडण्यासाठी २३ चेंडूंची वाट पाहावी लागली. भारतीय कर्णधार शुभमन गिलने आपल्या चारपैकी पहिल्या फिरकी गोलंदाजांचा वापर करताना अक्षर पटेलच्या हाती चेंडू सोपविला. मात्र, मार्करम आणि रिकल्टन दोघांनी अक्षरचा चांगलाच समाचार घेत षटकामागे पाचची धावगती राखली. त्याच वेळी दुसऱ्या स्पेलमध्ये बुमराने पाच चेंडूंच्या अंतराने दक्षिण आफ्रिकेची सलामीची जोडी तंबूत परत पाठवली. त्याच्या १४० कि.मी. वेगाने जाणाऱ्या चेंडूने रिकल्टनची यष्टी वाकवली. त्यानंतर एका उसळत्या चेंडूवर मार्करमच्या बॅटची कड घेतलेला चेंडू यष्टिरक्षक ऋषभ पंतने अचूक झेलला. पाठोपाठ कर्णधार टेम्बा बव्हुमा कुलदीपच्या फिरकीवर बचावात्मक खेळताना लेगस्लिपला जुरेलकडे झेल देऊन बाद झाला. या पडझडीनंतर दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज आत्मविश्वासाने खेळपट्टीवर उभा राहू शकला नाही. धावा काढण्यापेक्षा बचाव करण्याकडे त्यांचा कल राहिला आणि याचा फायदा उठवत भारतीय गोलंदाजांनी त्यांच्यावरील दडपण वाढवले.
दुसऱ्या सत्रात कुलदीपने विआन मुल्डरला (२४) पायचीत टिपले. बुमराने टोनी डी झॉर्झीचा (२४) अडथळा दूर केला. दक्षिण आफ्रिकेच्या पडझडीत याच जोडीने थोडा तग धरला. पण, त्यांच्या भागादारीतही आत्मविश्वासाची कमी होती. निम्मा संघ परतल्यावर मधल्या टप्प्यात सिराजने एकाच षटकांत काएल व्हेरेने (१६) आणा मार्को यान्सन (०) यांना बाद केले. अक्षर पटेलने बॉशचा अडथळा दूर केल्यावर बुमराने हार्मर आणि केशव महाराज यांना बाद करुन दक्षिण आफ्रिकेच्या डावाला पूर्णविराम दिला.
संक्षिप्त धावफलक
●दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ५५ षटकांत सर्वबाद १५९ (एडीन मार्करम ३१, विआन मुल्डर २४, टोनी डी झॉर्झी २४; जसप्रीत बुमरा ५/२७, मोहम्मद सिराज २/४७, कुलदीप यादव २/३६)
●भारत (पहिला डाव) : २० षटकांत १ बाद ३७ (यशस्वी जैस्वाल १२, केएल राहुल खेळत आहे १३, वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे ६; मार्को यान्सन १/११)
