India Playing 11 For IND vs PAK Asia Cup Clash: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक २०२५ मधील सामना खेळवला जात आहे. या सामन्यावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने चाहत्यांकडून केली जात आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्धचा हा सामना खेळू नये अशी मागणी चाहते करत आहेत. पण भारतीय सरकार आणि बीसीसीआयने टीम इंडियाला हा सामना खेळण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.

पाकिस्तानविरूद्ध सामन्याची नाणेफेक झाली असून पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याकरता भारताची प्लेईंग इलेव्हन कशी असेल जाणून घेऊया. पाकिस्तानच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये भारताविरूद्ध सामन्यासाठी कोणताही बदल झालेला नाही. तर सूर्यकुमार यादव आणि टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय होता, त्यामुळे पाकिस्तानचा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला आहे.

भारतीय संघ युएईविरूद्ध पहिल्या सामन्यात ३ फिरकीपटूंसह उतरला होता. तर जसप्रीत बुमराह हा भारताचा एकमेव पूर्णवेळ वेगवान गोलंदाज होता. तर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून खेळत होते. कुलदीप आणि शिवम दुबे यांनी मिळून सामन्यात ७ विकेट्स घेतल्या होत्या. तर फलंदाजीत शुबमन गिल आणि अभिषेक शर्माची जोडी सलामीला उतरली होती. तर संजू सॅमसन यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मधल्या फळीत संघाचा भाग होता. आता पाकिस्तानविरूद्धही भारतीय संघ सारख्याच संघासह उतरला आहे.

सामन्याच्या सुरूवातीला आता सर्वांच्या नजरा भारतीय गोलंदाजांवर असणार आहेत. जसप्रीत बुमराह, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. तर कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती आपल्या फिरकीची जादू कशी पसरवणार यावर सर्वांच्या नजरा असतील. तर अक्षर पटेल हा आपल्या फिरकीसह मैदानावरील चपळाईने महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

पाकिस्तानविरूद्ध सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन जाहीर

अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन(यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन:

साहिबजादा फरहान, सईम अयुब, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आघा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद