India Scored 2nd Highest T20 Asia Cup Total: आशिया चषक २०२५ मधील स्पर्धेत अजेय राहिलेल्या भारतीय संघाने अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे. टीम इंडिया सुपर फोरमधील अखेरचा सामना श्रीलंकेविरूद्ध खेळत आहे. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत आशिया चषक टी-२० मधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे.

भारताने नाणेफेक गमावल्याने संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. भारताची स्फोटक सलामी जोडी मैदानावर उतरली. पण या सामन्यात शुबमन गिल मात्र स्वस्तात बाद झाला. यानंतर अभिषेक शर्माने भारताचा डाव पुढे नेला. अभिषेक शर्माने आशिया चषक स्पर्धेत सलग तिसरं अर्धशतक झळकावत भारताच्या धावसंख्येचा पाया रचला.

अक्षर पटेलने भारताच्या डावातील अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत भारताला २०० धावांचा आकडा पार करून दिला. यासह भारताने श्रीलंकेविरूद्ध ५ बाद २०२ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. आशिया चषक टी-२० इतिहासातील भारताने दुसरी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे.

टी२० आशिया चषकमधील सर्वोच्च धावसंख्या

२ बाद २१२ धावा – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई, २०२२
५ बाद २०२ धावा – भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई, २०२५*
२ बाद १९३ धावा – पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग, शारजाह, २०२२
२ बाद १९२ धावा – भारत विरुद्ध हाँगकाँग, दुबई, २०२२

अभिषेक शर्माने ३१ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावांची खेळी करत उत्कृष्ट खेळी केली. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव १२ धावा माघारी परतला. यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. संजू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात २३ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह ३९ धावा करत बाद झाला.

तर तिलक वर्माचं एका धावेसाठी अर्धशतक हुकलं. तिलक वर्माने ३४ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ४९ धावांवर नाबाद परतला. अक्षर पटेल १५ चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह २१ धावा करत नाबाद परतला. यासह भारताने २० षटकांत ५ बाद २०२ धावा केल्या. आशिया चषक २०२५ मधील ही कोणत्याही संघाची सर्वात मोठी धावसंख्या आहे.