भारताची पहिल्या कसोटीवरील पकड घट्ट

राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना शेन वॉर्नने रवींद्र जडेजाला ‘रॉकस्टार’ म्हणून गौरवले होते. जडेजाने नाबाद १७५ धावांची दिमाखदार खेळी साकारून जणू मार्गदर्शक वॉर्नला आगळी आदरांजली वाहिली. त्यामुळे ८ बाद ५७४ धावांवर पहिला डाव घोषित करीत श्रीलंकेचे चार फलंदाज १०८ धावांत तंबूत धाडत भारताने पहिल्या कसोटीवरील पकड घट्ट केली आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी संघ व्यवस्थापनाने जडेजाच्या द्विशतकाऐवजी आश्वासक धावसंख्येवर डाव घोषित करण्याचे धोरण आखले. सकाळच्या सत्रात कारकीर्दीतील १२वी अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या अश्विनने तिसऱ्या सत्रात लाहिरू थिरिमाने आणि धनंजय डिसिव्ल्हा यांना बाद करीत भारताला सामन्यावर नियंत्रण मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. जडेजाने श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेला (२८) पायचीत करीत आपला शतकी आनंद द्विगुणित केला. उत्तरार्धात जसप्रीत बुमराने अँजेलो मॅथ्यूजला (२२) पायचीत करीत श्रीलंकेला आणखी एक धक्का दिला. आता श्रीलंकेला फॉलोऑन वाचवण्यासाठी आणखी २६७ धावांची आवश्यकता आहे.

त्याआधी, वॉर्नच्या आकस्मिक निधनाच्या धक्क्यातून क्रिकेटविश्व सावरण्याच्या २४ तासांहून कमी कालावधीत जडेजाने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली. २००८मध्ये ‘आयपीएल’ विजेत्या राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक-कर्णधार वॉर्नने जडेजाच्या फलंदाजीतील असामान्य गुणवत्तेला वाव दिला होता. आजमितीला अष्टपैलू खेळाडू म्हणून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत जडेजाने स्वत:ला सिद्ध केले आहे.

जडेजाने साडेपाच तास फलंदाजी करताना २२८ चेंडूंत १७ चौकार आणि ३ षटकारांनिशी आपली खेळी उभारली. त्याने अश्विनसह (६१) सातव्या गडय़ासाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विन परतल्यावर जडेजाने मोहम्मद शमीच्या (नाबाद २०) साथीने नवव्या गडय़ासाठी नाबाद १०३ धावांची भागीदारी केली. श्रीलंकेकडून सुरंगा लकमल, विश्व फर्नाडो आणि लसिथ एम्बुल्डेनिया यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

माझ्या सूचनेनंतर डाव घोषित -जडेजा

दुसऱ्या दिवशी चहापानाला काही वेळ शिल्लक असताना भारताने आपला पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. त्यावेळी जडेजा १७५ धावांवर खेळत असल्याने त्याला कारकीर्दीत पहिले द्विशतक करण्याची भारताने संधी दिली पाहिजे होती, असे चाहत्यांना वाटले. मात्र, जडेजाच्या सूचनेनंतरच भारताने डाव घोषित केल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘‘चेंडू कधी वर, तर कधी खाली राहात होता. तसेच फिरकीला अधिक मदत मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मी त्वरित डाव घोषित करून श्रीलंकेला फलंदाजी देण्याची संघ व्यवस्थापनाला सूचना केली. त्यांचे खेळाडू दीड दिवस क्षेत्ररक्षण करून थकलेले दिसले,’’ असे जडेजा म्हणाला. तसेच २००८ साली ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळण्याची संधी देणाऱ्या वॉर्नला जडेजाने आदरांजली वाहिली. कारकीर्दीच्या सुरुवातीलाच वॉर्नसारख्या दिग्गज खेळाडूसोबत खेळायला मिळणे हे माझे भाग्य होते, असे जडेजाने नमूद केले. 

४३२

अश्विनने धनंजय डिसिल्व्हाला बाद करीत न्यूझीलंडच्या रिचर्ड हॅडलीचा ४३१ बळींचा विक्रम मागे टाकला. आता सर्वाधिक कसोटी बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विन ११व्या स्थानी आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : १२९.२ षटकांत ८ बाद ५७४ डाव घोषित (रवींद्र जडेजा नाबाद १७५, ऋषभ पंत ९६; सुरंगा लकमल २/९०, विश्व फर्नाडो २/१३५, लसिथ एम्बुल्डेनिया २/१८८)

श्रीलंका (पहिला डाव) : ४३ षटकांत ४ बाद १०८ (दिमुथ करुणारत्ने २८, पथुम निसांका नाबाद २६; रविचंद्रन अश्विन २/२१)