India Test Squad Announced IND vs SA: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असून कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शुबमन गिल संघाचा कर्णधार असेल आणि पुन्हा उपकर्णधार बदलण्यात आला आहे.
१४ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असून भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघांमध्ये अनऑफिशियल कसोटी मालिका खेळवली जात आहे. यातील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने जिंकला.
भारताच्या कसोटी संघांचं नेतृत्त्व शुबमन गिलकडे आहे. तर उपकर्णधार ऋषभ पंत असेल. पंत संघात परतल्याने उपकर्णधारपद त्याच्याकडे देण्यात आलं आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध मालिकेसाठी रवींद्र जडेजाकडे संघाचं उपकर्णधारपद होतं. इंग्लंड मालिकेदरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाल्याने तो संघाबाहेर झाला होता. त्यावेळेस ध्रुव जुरेलने यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळली. तर एन. जगदीसनला बॅकअप कीपर म्हणून संघात सहभागी केलं होतं.
ऋषभ पंत संघात परतल्याने एन जगदीशनची निवड करण्यात आलेली नाही. पंत आता यष्टीरक्षक म्हणून प्राथमिक पसंती असेल. तर ध्रुव जुरेलची कामगिरी पाहता त्याला फलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. गोलंदाजी विभागात आणखी एक बदल करण्यात आला आहे. यावेळी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संघातून वगळण्यात आलं आहे. त्याच्या जागी आकाशदीपला संधी देण्यात आली. आकाशदीपबरोबर मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह असतील.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, कुलदीप यादव.
