युजवेंद्र चहल, टी. नटराजन आणि इतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या टी-२० सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला आहे. १६२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आश्वासक सुरुवात केल्यानंतर मधल्या षटकांमध्ये हाराकिरी केली. रविंद्र जाडेजाऐवजी बदली खेळाडू म्हणून आलेल्या चहलच्या फिरकीच्या जाळ्यात कांगारु अकडले. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

१६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. कर्णधार फिंच आणि डार्सी शॉर्ट यांनी भारतीय गोलंदाजांची पॉवरप्लेच्या षटकांमध्ये धुलाई करत अर्धशतकी भागीदारी केली. रविंद्र जाडेजाचं मैदानावर नसणं टीम इंडियाला चांगलंच महागात पडत होत. त्यात भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेल टाकत आणि धावा बहाल करत कांगारंना मदतच केली. अखेरीस चहलने कर्णधार फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला, ३५ धावा काढून तो माघारी परतला. यानंतर चहलनेच स्टिव्ह स्मिथला स्वस्तात माघारी धाडलं.

यानंतर फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला माघारी धाडत टी. नटराजनने कांगारुंच्या अडचणींमध्ये भर टाकली. मॅक्सवेल नटराजनची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली पहिली विकेट ठरला. यानंतर फटकेबाजी करणाऱ्या डार्सी शॉर्टलाही नटराजनने माघारी धाडलं, त्याने ३४ धावा केल्या. हा धक्का कमी होता तोच चहलने मॅथ्यू वेडला आपल्या जाळ्यात अडकवत कांगारुंना पाचवा धक्का दिला, ज्यामुळे मोक्याच्या षटकांमध्ये धावा जमावण्याऐवजी कांगारुंचा संघ बॅकफूटवर फेकला गेला. यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सावरुच शकले नाहीत. टीम इंडियाकडून चहल आणि नटराजन यांनी प्रत्येकी ३-३ तर दीपक चहरने १ बळी घेतला.

वन-डे मालिका गमावल्यानंतर भारतीय फलंदाजांचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशाजनक कामगिरीचं सत्र सुरुच राहिलं आहे. पहिल्या टी-२० सामन्यात सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळी आणि रविंद्र जाडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने १६१ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवत त्यांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. परंतू जाडेजाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत टीम इंडियाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. महत्वाच्या क्षणी जाडेजाने २३ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. शिखर धवन मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटही फारशी चमक दाखवू शकला नाही. फिरकीपटू स्वेप्सनच्या गोलंदाजीवर विराट ९ धावा काढून माघारी परतला. एकीकडे लोकेश राहुल एक बाजू लावून धरत फटकेबाजी करत होता, परंतू दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने भारतीय फलंदाज आपली विकेट फेकत होते. संजू सॅमसन, मनिष पांडेही फारकाळ तग धरु शकले नाहीत. अर्धशतक झळकावल्यानंतर लोकेश राहुल हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४० चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावा केल्या. यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजी करत भारताची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतू हार्दिक हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतर उर्वरित भारतीय फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला १६१ धावांचा टप्पा गाठून दिला. ऑस्ट्रेलियाकडून हेन्रिकेजने ३ तर स्वेप्सन-झॅम्पा आणि स्टार्क यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Live Blog

Highlights

    17:30 (IST)04 Dec 2020
    टीम इंडियाची पहिल्या टी-२० सामन्यात बाजी

    ११ धावांनी कांगारुंवर केली मात, चहल-नटराजन यांचा भेदक मारा

    17:23 (IST)04 Dec 2020
    ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का, मिचेल स्टार्क माघारी

    यॉर्कर किंग टी. नटराजनने उडवला स्टार्कचा त्रिफळा, कांगारुंच्या अडचणींमध्ये आणखी भर

    17:18 (IST)04 Dec 2020
    ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल

    दीपक चहरच्या गोलंदाजीवर हेन्रिकेज पायचीत होऊन माघारी, DRS मध्येही तिसऱ्या पंचाकडून हेन्रिकेज बाद असल्यावर शिक्कामोर्तब

    ३० धावा करुन हेन्रिकेज माघारी परतला

    17:12 (IST)04 Dec 2020
    युजवेंद्र चहलच्या जाळ्यात अडकले कांगारु, निम्मा संघ माघारी

    मॅथ्यू वेडचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सीमारेषेवर असलेल्या कोहलीने घेतला झेल

    कांगारुंचा निम्मा संघ माघारी, वेड ७ धावांवर माघारी परतला, सामन्यावर टीम इंडियाचं वर्चस्व

    17:03 (IST)04 Dec 2020
    सलामीवीर डार्सी शॉर्ट माघारी परतला, नटराजनचा कांगारुंना दे धक्का...

    फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शॉर्ट हार्दिक पांड्याकडे झेल देत माघारी परतला, शॉर्टची ३८ चेंडूत ३४ धावांची खेळी संपुष्टात

    कांगारु पहिल्या टी-२० सामन्यात बॅकफूटवर

    16:41 (IST)04 Dec 2020
    टीम इंडियाचं दणक्यात पुनरागमन

    टी. नटराजनने ग्लेन मॅक्सवेलला धाडलं माघारी, पंचांनी मॅक्सवेल पायचीत असल्याचं अपील फेटाळलं. DRS मध्ये तिसऱ्या पंचांच्या पाहणीत मॅक्सवेल बाद असल्याचं निष्पन्न

    अवघ्या २ धावा काढून मॅक्सवेल माघारी परतला...कांगारु बॅकफूटवर

    16:34 (IST)04 Dec 2020
    युजवेंद्र चहलचा कांगारुंना आणखी एक धक्का

    स्टिव्ह स्मिथ चहलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी, सीमारेषेवर संजू सॅमसनने घेतला स्मिथचा सुरेथ झेल

    जाडेजाच्या बदली मैदानावर आलेल्या चहलचे कांगारुंना दणके, १२ धावांची खेळी करत स्मिथ माघारी परतला

    16:24 (IST)04 Dec 2020
    ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडण्यात भारताला यश

    कर्णधार फिंच माघारी, युजवेंद्र चहलने घेतला बळी. हार्दिक पांड्याने घेतला सुरेथ झेल

    फिंचची ३५ धावांची खेळी, पहिल्या विकेटसाठी डार्सी शॉर्टसोबत ५६ धावांची भागीदारी करत फिंचने आपल्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली

    16:17 (IST)04 Dec 2020
    टीम इंडियाचं गलथान क्षेत्ररक्षण

    भारतीय क्षेत्ररक्षकांनी सोडले सोपे झेल, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाना जीवदान

    16:15 (IST)04 Dec 2020
    ऑस्ट्रेलियन सलामीवीरांची आश्वासक सुरुवात

    डार्सी शॉर्ट, फिंच जोडीची फटकेबाजी....ऑस्ट्रेलियन संघाला ओलांडून दिला ५० धावसंख्येचा टप्पा

    16:10 (IST)04 Dec 2020
    पहिल्या टी-२० सामन्यात रविंद्र जाडेजाच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला माहिती आहे का??
    16:08 (IST)04 Dec 2020
    टीम इंडियाच्या अडचणींमध्ये वाढ

    रविंद्र जाडेजा मैदानाबाहेर, बदली खेळाडू म्हणून चहल मैदानावर...जाणून घ्या काय आहे कारण

    15:47 (IST)04 Dec 2020
    फटकेबाजी करणाऱ्या रविंद्र जाडेजाने मोडला धोनीचा विक्रम

    नाबाद ४४ धावांची खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरला, जाणून घ्या सविस्तर

    15:38 (IST)04 Dec 2020
    टी-२० क्रिकेटमध्ये रविंद्र जाडेजाची सर्वोत्तम कामगिरीची नोंद
    15:27 (IST)04 Dec 2020
    रविंद्र जाडेजाने राखली टीम इंडियाची लाज

    अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत जाडेजाने टीम इंडियाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. हेजलवूड आणि स्टार्कच्या गोलंदाजीवर लगावले चौकार-षटकार

    भारताची निर्धारित २० षटकांत १६१ धावांपर्यंत मजल, ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचं आव्हान, जाडेजाची नाबाद ४४ धावांची खेळी

    15:23 (IST)04 Dec 2020
    राहुलची फटकेबाजी, टी-२० क्रिकेटमध्ये विराट-रोहित-धोनीच्या पंगतीत मिळवलं स्थान

    आयपीएलमध्ये तुफान फटकेबाजी करणाऱ्या के.एल राहुलनं पहिल्याच टी-२० सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी केली आहे. या अर्धशतकी खेळीनंतर राहुलनं विराट कोहली, रोहित शर्मा आणि धोनीच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.

    15:22 (IST)04 Dec 2020
    टीम इंडियाला सातवा धक्का

    मिचेल स्टार्कच्या अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात सुंदर माघारी

    15:20 (IST)04 Dec 2020
    दुखापतीमधून सावरत जाडेजाची फटकेबाजी

    १९ व्या षटकात जाडेजाच्या मांडीचा स्नायू दुखावला....मात्र उपचार घेत जाडेजाची हेजलवूडच्या गोलंदाजीवर फटकेबाजी

    टीम इंडियाला गाठून दिला १५० धावांचा टप्पा

    15:04 (IST)04 Dec 2020
    फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात हार्दिक पांड्या माघारी, भारताला सहावा धक्का

    धावगती वाढवण्यासाठी हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर पांड्याचा फटकेबाजीचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला

    स्टिव्ह स्मिथकडे झेल देत पांड्या परतला माघारी, केली १६ धावांची खेळी

    14:50 (IST)04 Dec 2020
    ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा भेदक मारा

    भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात कांगारु यशस्वी

    14:48 (IST)04 Dec 2020
    टीम इंडियाला मोठा धक्का, अर्धशतकवीर लोकेश राहुल माघारी

    हेन्रिकेजच्या धीम्या गतीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा राहुलचा प्रयत्न फसला, अबॉटने घेतला सुरेख झेल

    ४० चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह राहुलची ५१ धावांची खेळी, टीम इंडियाचा निम्मा संघ माघारी

    14:45 (IST)04 Dec 2020
    मनिष पांडेला फलंदाजीत वरच्या क्रमांकावर पाठवून टीम इंडियाने चूक केली??

    आकाश चोप्रा म्हणतो...

    14:42 (IST)04 Dec 2020
    टीम इंडियाला आणखी एक धक्का देण्यात कांगारु यशस्वी

    मनिष पांडे झॅम्पाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. टप्पा पडून अतिरीक्त बाऊन्स मिळाल्यामुळे फटका खेळण्याच्या प्रयत्नात मनिष पांडेचा अंदाज चुकला

    जोश हेजलवूडने घेतला पांडेचा सुरेख झेल, अवघ्या दोन धावा काढत पांडे माघारी

    14:35 (IST)04 Dec 2020
    टीम इंडियाची जमलेली जोडी फुटली, संजू सॅमसन माघारी

    हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनचा फटका चुकला, स्वेप्सनच्या हाती सोपा झेल देऊन सॅमसन माघारी

    १५ चेंडूत १ चौकार आणि एका षटकारासह सॅमसनच्या २३ धावा, लोकेश राहुलसोबत ३८ धावांची भागीदारी

    14:32 (IST)04 Dec 2020
    उप-कर्णधार लोकेश राहुलचं अर्धशतक

    संजू सॅमसनच्या साथीने फटकेबाजी करत...राहुलची मैदानात फटकेबाजी, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत झळकावलं अर्धशतक

    14:24 (IST)04 Dec 2020
    टीम इंडियाचा डोलारा सांभाळताना लोकेश राहुलची विराट कोहलीशी बरोबरी
    14:23 (IST)04 Dec 2020
    सलामीवीर लोकेश राहुलची फटकेबाजी

    कॅनबेराच्या मैदानावर फॉर्मात असलेला लोकेश राहुल करतोय फटकेबाजी. ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंवर राहुलचा हल्लाबोल

    भारतीय संघाने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

    14:14 (IST)04 Dec 2020
    टीम इंडियाला दुसरा धक्का, कर्णधार विराट कोहली माघारी

    फिरकीपटू स्वेप्सनच्या गोलंदाजीवर खेळताना बॉल विराटच्या बॅटची कड घेऊन हवेत. सोपा झेल पकडत स्वेप्सनने विराटला धाडलं माघारी

    ९ चेंडूत ९ धावा करत भारतीय कर्णधार माघारी परतला, टीम इंडियाची खराब सुरुवात

    13:59 (IST)04 Dec 2020
    टीम इंडियाच्या संघनिवडीवर आकाश चोप्राचं प्रश्नचिन्ह
    13:56 (IST)04 Dec 2020
    टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात, सलामीवीर शिखर धवन माघारी

    मिचेल स्टार्कने उडवला शिखर धवनचा त्रिफळा, ६ चेंडूत अवघी १ धाव काढत धवन माघारी

    पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात धवनचा स्टम्प उडाला, स्टार्कचा भेदक मारा

    13:48 (IST)04 Dec 2020
    युवा भारतीय खेळाडूंकडून संघाला मोठ्या आशा
    13:37 (IST)04 Dec 2020
    भारतीय संघातही युवा खेळाडूंना स्थान
    13:36 (IST)04 Dec 2020
    ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकली

    प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

    असा आहे ऑस्ट्रेलियाचा अंतिम ११ जणांचा संघ...

    13:35 (IST)04 Dec 2020
    वन-डे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी सज्ज

    आयपीएलचा तेरावा हंगाम आटोपून ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा