ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. तिसऱ्या वन-डे सामन्यात हार्दिक पांड्यासोबत महत्वपूर्ण दीडशतकी भागीदारी केलेल्या जाडेजाने पहिल्या टी-२० सामन्यातही महत्वाची भूमिका बजावली. ५ बाद ९२ अशी परिस्थिती असताना जाडेजाने आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत टीम इंडियाला १६१ धावांचा टप्पा गाठून दिला.

रविंद्र जाडेजाने अखेरच्या षटकांत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. २३ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह जाडेजाने नाबाद ४४ धावा केल्या. यानिमीत्ताने जाडेजाने धोनीचा विक्रमही मोडला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता जाडेजाच्या नावावर जमा झाला आहे.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारताचे इतर गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. लोकेश राहुलने संयमी खेळी करत ४० चेंडूत ५१ धावा करत आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं.