India vs Australia 2nd ODI,Team India Record At Adelaide: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. तर मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबरला अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाला जर मालिका बरोबरीत आणायची असेल, तर हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. पण अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं भारतीय संघासाठी इतकं सोपं नसणार आहे. दरम्यान अॅडलेडमध्ये कसा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

अॅडलेडमध्ये कसा आहे भारतीय संघाचा रेकॉर्ड?

अॅडलेडमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या मैदानावर भारतीय संघाने १४ वनडे सामने खेळले आहेत. यापैकी ९ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर ४ सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर १ सामना अनिर्णित राहिला होता. भारतीय संघ २०१९ मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यातही भारतीय संघाने विजयाची नोंद केली होती. तर ऑस्ट्रेलियाविरूद्धचा रेकॉर्ड पाहिला, तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या मैदानावर ६ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने ४ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर केवळ २ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाच्या बाजून आहे. पण भारतीय संघाला मालिकेत टिकून राहायचं असेल, तर कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं असणार आहे.

पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव

या मालिकेतील पहिला सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात पावसाने ४ वेळा हजेरी लावली होती. त्यामुळे षटकं कमी करण्यात आली होती. २६-२६ षटकांचा सामना पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २६ षटकअखेर ९ गडी बाद १३६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला २६ षटकात हा सामना जिंकण्यासाठी १३१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने २१.१ षटकात १३१ धावांचा पल्ला गाठला आणि ७ गडी राखून विजयाची नोंद केली. या सामन्यात भारतीय संघातील प्रमुख फलंदाज विराट कोहली,रोहित शर्मा, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरसारखे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. आता दुसऱ्या सामन्यात या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

शुबीमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल