वृत्तसंस्था, अॅडलेड
फलंदाजांचे अपयश आणि पावसाचा व्यत्यय या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय पुरुष संघाला हार पत्करावी लागली होती. आता तीन सामन्यांच्या या मालिकेतील आव्हान शाबूत राखायचे झाल्यास भारताला उद्या, गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयी पुनरागमन करावे लागेल. भारतीय संघ पहिल्या सामन्यातील संघच कायम राखणार की फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देणार, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
पर्थ येथे झालेल्या सामन्यात पावसाने चार वेळा व्यत्यय आणला. त्यामुळे सामना २६-२६ षटकांचा करण्यात आला होता. नाणेफेक गमावल्याने प्रथम फलंदाजी करावी लागल्यानंतर आव्हानात्मक वातावरण, तसेच मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्या भेदक माऱ्याने भारतीय संघाची कसोटी पाहिली. या सामन्यात प्रामुख्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुनरागमनाकडे सर्वाचे लक्ष होते. मात्र, हे दोघेही अपयशी ठरले. हेझलवूडने रोहितला आठ धावांवर, तर स्टार्कने कोहलीला शून्यावर माघारी धाडले. तसेच केएल राहुल आणि अक्षर पटेल वगळता सर्वच फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे भारताला २६ षटकांत १३६ धावाच करता आल्या. मग ऑस्ट्रेलियाने विजयी लक्ष्य २१.१ षटकांत तीन गडय़ांच्या मोबदल्यात पूर्ण करत मालिकेत आघाडी घेतली.
पर्थ येथील खेळपट्टीवर चेंडूला अतिरिक्त उसळी मिळत होती. आता मालिकेतील दुसरा सामना अॅडलेड येथे रंगणार आहे. अॅडलेड ओव्हलची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांइतकीच फिरकीपटूंनाही मदत करते. अशात भारताकडे कुलदीप यादवच्या रूपात विशेषज्ञ फिरकी गोलंदाज खेळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. गोलंदाजीसह फलंदाजीत योगदान देण्यात सक्षम असणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली. परंतु त्याला मर्यादित यश मिळाले. तसेच एक वेगवान गोलंदाज कमी करायचा झाल्यास हर्षित राणाला वगळून कुलदीपला खेळवले जाऊ शकते.
रोहित, विराटला सूर गवसणार?
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुनरागमन अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितला हेझलवूडच्या अतिरिक्त उसळी घेतलेल्या चेंडूने अडचणीत टाकले, तर विराटला उजव्या यष्टिबाहेरील चेंडू मारण्याची सवय महागात पडली. विराटला स्टार्कचा सामना करता आला नाही. हे दोघेही पाच महिन्यांनी स्पर्धात्मक क्रिकेट खेळत असल्याने त्यांना लय मिळवण्यासाठी एखाद सामना लागणार हे समजण्यासारखे आहे. मात्र, आता त्यांच्यावर कामगिरी उंचावण्यासाठी दडपण असेल.