वृत्तसंस्था, सिडनी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज, शनिवारी रंगणार आहे. भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यांत हार पत्करावी लागल्याने त्यांनी मालिकाही गमावली आहे. तरीही आज ऐतिहासिक सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (एससीजी) होणाऱ्या सामन्याला विशेष महत्त्व आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा हा ऑस्ट्रेलियातील अखेरचा सामना ठरण्याची शक्यता असून प्रेक्षकांकडून त्यांना भावनिक निरोप मिळणे अपेक्षित आहे.

या मालिकेला सुरुवात होण्याआधीपासूनच रोहित आणि विराट या माजी कर्णधारांबाबत सर्वाधिक चर्चा रंगली होती. कसोटी आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झालेले हे दोघेही पाच महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करताना हे दोघे कशी कामगिरी करतात हे पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पर्थ येथील पहिल्या सामन्यात अपयशी ठरणाऱ्या रोहितने ॲडलेडवरील दुसऱ्या सामन्यात कामगिरी उंचावली. त्याने आव्हानात्मक खेळपट्टीवर संयम राखून फलंदाजी करताना ९७ चेंडूंत ७३ धावांची खेळी साकारली.

दुसरीकडे, कोहलीची कामगिरी मात्र निराशाजनक ठरली आहे. याआधी ऑस्ट्रेलियात एकदाही शून्यावर बाद न होणाऱ्या कोहलीवर या मालिकेतील सलग दोन सामन्यांत खातेही न उघडता माघारी परतण्याची नामुष्की ओढवली. दोन सामन्यांत मिळून तो १२ चेंडू खेळला. त्यातही तो चाचपडताना दिसला. त्याच्या देहबोलीत आणि फलंदाजीत पूर्वीसारखा आत्मविश्वास दिसून आला नाही. विशेषत: पहिल्या सामन्यात त्याला उजव्या यष्टिबाहेरील चेंडूशी छेडछाड करण्याची सवय महागात पडली. मात्र, आता बहुधा ऑस्ट्रेलियन भूमीतील अखेरचा सामना खेळताना दमदार कामगिरीचा कोहलीचा मानस असेल. ऑस्ट्रेलियातील अनुभवांनी आपल्याला क्रिकेटपटू म्हणून घडविल्याचे कोहलीने याआधी सांगितले आहे. आता त्याच ऑस्ट्रेलियाला यशस्वी खेळीसह निरोप देण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

‘एससीजी’च्या मैदानावर गेल्या काही वर्षांत भारतीय संघाला फारसे यश मिळालेले नाही. या मैदानावरील ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या पाचपैकी केवळ एका एकदिवसीय सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. आता हा इतिहास बदलण्यास भारतीय संघ उत्सुक असेल.

कुलदीपला अखेर संधी?

– मालिकेतील पहिल्या सामन्यात केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनी, तर दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि अक्षर यांनी चांगली फलंदाजी केली. कोहली आणि कर्णधार शुभमन गिल यांना सूर गवसलेला नाही. असे असले तरी तिसऱ्या सामन्यासाठी फलंदाजांच्या फळीत बदल होणे अपेक्षित नाही.

– गोलंदाजीत मात्र चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकेल. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत संघ संतुलित करण्यासाठी पहिल्या दोन सामन्यांत नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलूंना संधी देण्यात आली. त्यामुळे विशेषज्ञ फिरकीपटू कुलदीपला संघाबाहेर बसावे लागले.

– कुलदीपच्या अनुपस्थितीत भारताला मधल्या षटकांत बळी मिळवणे अवघड गेले. सिडनीच्या मैदानावर फिरकीपटूंना मदत मिळते. त्यामुळे कुलदीपला खेळवणे भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल. तसेच ट्वेन्टी-२० मालिकेच्या दृष्टीने अर्शदीप सिंगला विश्रांती देऊन प्रसिध कृष्णा खेळवले जाऊ शकते.

झॅम्पासह कुनमनचा समावेश?

पहिले दोन सामने जिंकत ऑस्ट्रेलियाने मालिकेत विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे त्यांनाही संघनिवडीत प्रयोगाची संधी आहे. पहिल्या सामन्यात डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुनमनने चांगली गोलंदाजी केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यासाठी अनुभवी लेग-स्पिनर ॲडम झॅम्पाचे पुनरागमन झाल्यानंतर कुनमनला संघाबाहेर जावे लागले. आता सिडनीच्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन संघ झॅम्पा आणि कुनमन या दोघांना खेळवण्याचा विचार करू शकेल. फलंदाजीत मॅथ्यू शॉर्ट, मिचेल ओव्हेन आणि कूपर कॉनली या नवोदितांचा कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल.

वेळ : सकाळी ९ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस २, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.