India vs South Africa ICC Cricket World Cup 2023 Highlights Match Updates: विश्वचषकात टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठवा विजय नोंदवला. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेने सपशेल लोटांगण घातले. भारताने तब्बल २४३ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. या विजयाने टीम इंडियाचे गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आहे. आजच्या सामन्यात बर्थडे बॉय विराट कोहलीने वन डे क्रिकेटमधील ४९वे शतक झळकावत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

विश्वचषक २०२३च्या ३७व्या सामन्यात आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५० षटकांत ५ गडी गमावून ३२६ धावा केल्या. विराट कोहली १२१ चेंडूत १०१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी, रवींद्र जडेजा १५ चेंडूत २९ धावा करून नाबाद राहिला. त्याआधी श्रेयस अय्यरने ७७ धावा केल्या. श्रेयस आणि विराट यांच्यात १३४ धावांची शतकी भागीदारी केली.

तत्पूर्वी, टीम इंडियाची सुरुवात खूपच आक्रमक झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलने आफ्रिकेच्या गोलंदाजांवर धावा बोलत पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ९० धावा केल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित ४० धावा करून बाद झाला. रोहित शर्माने शुबमन गिलसह ३५ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. रोहित २४ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले.

शुबमन गिल २४ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. ९३ धावांवर दोन विकेट्स पडल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी १३४ धावांची भागीदारी केली. श्रेयस ८७ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून बाद झाला. केएल राहुल काही विशेष करू शकला नाही आणि त्याला केवळ आठ धावा करता आल्या. सूर्यकुमार यादवने १४ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने जलद २२ धावा केल्या.

विराटने ४९व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. १२१ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १०१ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याचवेळी जडेजाने २९ धावांच्या नाबाद खेळीत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. विराटचे हे ४९वे शतक होते. त्याने सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना या विश्वचषकातील सर्वात मनोरंजक सामना ठरू शकतो, असे बोलले जात आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्मात आहेत. भारताने आतापर्यंतचे सातही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने सातपैकी सहा सामने जिंकले आहेत. आज जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहील. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर संपन्न झाला आहे.

Live Updates

CWC 2023 India vs South Africa Highlights Score Updates in Marathi: भारत वि दक्षिण आफ्रिका हायलाईट्स स्कोअर अपडेट्स

13:40 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: दोन्ही संघ मैदानात उतरले

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ ईडन गार्डन्सवर पोहोचले आहेत. खेळाडूंनी वॉर्मअप सुरू केले आहे. यावर्षी भारताने एकदिवसीय सामन्यांपैकी ८३ टक्के सामने प्रथम फलंदाजी करून जिंकले आहेत, तर ८० टक्के सामने पाठलाग करून जिंकले आहेत. त्याचबरोबर या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत पाचपैकी पाच सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात डावांचा पाठलाग करताना ते सामना जिंकतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

13:38 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: टीम इंडियाने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

भारताचा कर्णधार रोहित शर्माने कोलकत्यामधील ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिका या सामन्यात धावांचा पाठलाग करणार आहे. टीम इंडियाने आजच्या सामन्यात कोणताही बदल केला नाही.

13:13 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: वर्ल्ड कपमधील दोन्ही संघांची आकडेवारी

विश्वचषकात दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी भारताने दोन आणि दक्षिण आफ्रिकेने तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून टीम इंडिया बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.

12:55 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: कोणत्या खेळाडूंनी आतपर्यंत त्यांच्या वाढदिवशी शतक झळकावले?

टॉम लॅथम १४०* नेदरलँड्स ०२/०४/२०२२

रॉस टेलर १३१* पाकिस्तान ०८/०३/२०११

सनथ जयसूर्या १३० बांगलादेश ३०/०६/२००८

मिचेल मार्श १२१ पाकिस्तान २०/१०/२०२३

सचिन तेंडुलकर १३४ ऑस्ट्रेलिया २४/०४/१९९८

विनोद कांबळी १००* इंग्लंड १८/०१/१९९३

12:32 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: विराट वाढदिवसाच्या दिवशी शतक करू शकेल का?

या विश्वचषकात आतापर्यंत विराटने ८५, ५५*, १६, १०३*, ९५, ० आणि ८८ अशा खेळी केल्या आहेत. जर त्याने आज शतक केले तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या वाढदिवशी शतक ठोकणारा सातवा खेळाडू ठरेल. टॉम लॅथम, रॉस टेलर, सनथ जयसूर्या, मिचेल मार्श, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी यापूर्वी ही कामगिरी केली आहे.

12:18 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: अश्विन किंवा शार्दुलला संधी मिळेल का?

भारतीय संघात श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे एकमेव फलंदाज आहेत ज्यांना संघातून वगळले जाऊ शकते. ते बाहेर गेल्यास रविचंद्रन अश्विन किंवा शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. दोघेही गोलंदाजीबरोबर थोडीफार फलंदाजीही करू शकतात. त्याचबरोबर मधल्या फळीत इशान किशनलाही संधी दिली जाऊ शकते. कारण, भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि संघ व्यवस्थापन इशानलाही संधी देऊ इच्छित आहे. जेणेकरून गरज पडल्यास उपांत्य आणि अंतिम सामन्यांपूर्वी त्याला सामन्याचा सराव असू शकतो.

12:08 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: कोलकात्याच्या ईडन गार्डन्सची काय आहे आकडेवारी? जाणून घ्या

फलंदाजीसाठी योग्य मानल्या जाणाऱ्या कोलकात्याच्या या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फायदेशीर ठरू शकतो. या मैदानाची आकडेवारीही प्रथम फलंदाजी करणाऱ्यासाठी चांगली मानली जाते. ईडन गार्डन्स मैदानावर आतापर्यंत एकूण ३७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २१ सामन्यांत विजय मिळवला आहे. केवळ १५ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला यश मिळाले आहे.

12:05 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: काय रंग दाखवणार आजची खेळपट्टी?

या स्पर्धेत आतापर्यंत या मैदानावर दोन सामने झाले असून दोन्ही सामन्यांमध्ये गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांनाही जवळपास समान मदत मिळाली आहे. आजच्या सामन्यातही खेळपट्टीचे स्वरूप असेच असेल अशी अपेक्षा आहे.

ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. खेळपट्टीवर चांगली उसळी मिळाल्याने फलंदाजांना फटके खेळणे सोपे जाते. मात्र, वेगवान गोलंदाजही सुरुवातीला नव्या चेंडूने आपली ताकद दाखवतात. तर दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरते.

11:57 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: कसेल असेल कोलकात्याचे हवामान?

कोलकात्याच्या हवामानाबद्दल जर बोलायचे झाले तर, नोव्हेंबरच्या आसपास येथे सतत बदल होत आहेत. पावसाळा संपून आता हिवाळा सुरू झाला आहे. असे असतानाही कधीही पाऊस पडू शकतो, असे मानले जात आहे. सामन्यादरम्यान बहुतांश वेळा आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात २८ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याचा अंदाज असून, संध्याकाळी ते २२ अंश सेल्सिअसपर्यंत किंचित खाली येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पाऊस पडला तर काय होईल?

कोलकात्यात पाऊस पडल्यास सामन्यातील षटके कमी होऊ शकतात. त्यामुळे प्रेक्षकांना संपूर्ण खेळ पाहता येणार नाही. त्याचवेळी पावसामुळे सामना रद्द होऊन दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाऊ शकतो. स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये राखीव दिवसाचा नियम आहे. त्यामुळे चाहत्यांना अशी आशा आहे की, दोन मोठ्या संघांमध्ये रोमांचक सामना व्हायला हवा.

11:53 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: हार्दिक पांड्याबाबत प्रशिक्षक राहुल द्रविडचे सूचक विधान

हार्दिक पांड्या जरी दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला असेल तरी त्याच्या जाण्याने टीम इंडियाचे फारसे नुकसान झाले नाही, असे मत भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड याने व्यक्त केले. तो म्हणाला की, ““हार्दिक आम्हाला सहाव्या गोलंदाजीचा पर्याय देतो. पण आम्ही सहाव्या गोलंदाजीच्या पर्यायाशिवाय शेवटचे चार सामने खेळलो. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मालिकेतही आम्ही सहाव्या गोलंदाजीच्या पर्यायाशिवाय काही सामने खेळलो होतो. आम्ही आमचे दोन सामने, मोहाली आणि इंदोर मध्ये फक्त पाच गोलंदाजी पर्यायांसह जिंकले. त्यामुळे, आम्ही या आव्हानाला सकारात्मक पद्धतीने स्विकारले आहे.”

11:43 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: विराट कोहली गरज पडल्यास सामन्यात गोलंदाजी करू शकतो- राहुल द्रविड

सामन्यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला की, रोहित शर्मा, शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली गरज पडल्यास गोलंदाजी करू शकतात. यावरून रोहित सध्या संघात कोणताही बदल करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट होते.

11:41 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: सूर्यकुमार यादव ऐवजी इशान किशनला आजच्या सामन्यात मिळणार का संधी?

हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता टीम इंडिया आपल्या प्लेइंग-११ मध्ये बदल करू शकते. इशान किशनला संधी मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे, असे झाल्यास श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यांना बाहेर बसावे लागू शकते.

11:36 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: कोलकातामध्ये पूर्ण सामना होणार का? जाणून घ्या

IND vs SA, World Cup 2023: भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यावर हवामानाचा परिणाम होईल का? जाणून घ्या पिच रिपोर्ट
11:35 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: आज विराट कोहलीचा ३५वा वाढदिवस

विराट कोहली: पश्चिम दिल्लीतल्या रांगड्या भिडूची गोष्ट
11:34 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिध कृष्णाला विश्वचषकात मिळाली संधी

World Cup 2023: हार्दिक पांड्याचा बदली खेळाडू अक्षर पटेल ऐवजी प्रसिध कृष्णा का ठरला पहिली पसंती? जाणून घ्या
11:31 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर राहुल द्रविडचे सूचक विधान

IND vs SA: ईडन गार्डनची खेळपट्टी पाहून राहुल द्रविड खूश, CAB अधिकाऱ्यांनी भारतीय प्रशिक्षकाला दिला ‘हा’ सल्ला
11:30 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: आजच्या सामन्यात प्रसिध कृष्णाच्या येण्याने प्लेईंग-११ मध्ये होणार का बदल?

IND vs SA: प्रसिध कृष्णाच्या येण्याने टीम इंडियात काय बदल होणार? जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग-११
11:16 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली त्याच्या वाढदिवशी तेंडुलकरच्या विक्रमाची करणार बरोबरी?

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ३५ वर्षांचा झाला आहे. तो देशातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. त्याच्या वाढदिवशी तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळणार असून त्यात तो शतक ठोकून सचिनच्या विश्वविक्रमाची बरोबरी करू शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक ४९ शतके आहेत आणि कोहली ४८ शतकांसह एक पाऊल मागे आहे.

11:12 (IST) 5 Nov 2023
IND vs SA: टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आठवा विजय नोंदवण्यासाठी सज्ज

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा आठवा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला आपली विजयी घोडदौड कायम ठेवत सलग आठवा विजय नोंदवायचा आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत, मात्र या दोघांमध्ये लढत असेल ती सर्वोत्तम संघ म्हणून सिद्ध करण्याची.

CWC 2023 India vs South Africa Highlights Score Updates in Marathi: भारत वि दक्षिण आफ्रिका हायलाईट्स स्कोअर अपडेट्स

भारताने दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाचा अजिंक्य राहण्याचा ट्रेंड कायम आहे. सलग आठ विजयांसह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले असून आता भारत अव्वल स्थानावर राहणार हेही निश्चित झाले आहे.