अ‍ॅडलेड : अपयशामुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या केएल राहुलला गेले वर्षभर संघ व्यवस्थापनाने पाठिंबा दिला असून, उर्वरित ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतही संघ व्यवस्थापन राहुलच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, असे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत राहुलने आतापर्यंत केवळ २२ धावा केल्या असल्या, तरी बुधवारी बांगलादेशविरुद्ध खेळताना सलामीसाठी आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. गेले वर्षभर आम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे राहुलच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. हाच पाठिंबा पुढेही कायम राहील, असेही द्रविडने स्पष्ट केले.

राहुलच्या अपयशाविषयी द्रविड म्हणाला, ‘‘राहुल गुणी फलंदाज आहे. यापूर्वी अनेकदा राहुलने आपली गुणवत्ता आणि उपयुक्तता सिद्ध केली आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये असे अपयश कधी ना कधी प्रत्येकाच्या वाटेला येतच असते. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत सलामीला खेळणे सोपे नसते.’’ एकूणच किमान या स्पर्धेत तरी राहुलला संघातून वगळले जाणार नाही असेच संकेत द्रविडच्या बोलण्यातून मिळाले.

पत्रकार परिषदेत राहुलविषयीच्या प्रत्येक प्रश्नाला द्रविडने टोलवले. ‘‘आगामी सामन्यांत राहुलला लय गवसेल. आपल्याला राहुलची क्षमता ठाऊक आहे. त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली आहे. राहुल बॅकफूटवर चांगला खेळतो. येथील वातावरणात असेच खेळावे लागते,’’ असे म्हणत द्रविडने राहुलच्या निवडीचे समर्थन केले.

भारताचा फलंदाज विराट कोहलीच्या खोलीत जाऊन पर्थमधील एका हॉटेलच्या कर्मचाऱ्याने चित्रफित तयार केली आणि मग ती चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित केली. याबाबत द्रविडने नाराजी व्यक्त केली. ‘‘एखाद्या खेळाडूचे खासगी आयुष्य अशा पद्धतीने समोर आणणे हे अयोग्य आहे. खेळाडूंसाठी हॉटेलमधील खोली ही सर्वात सुरक्षित जागा असते. या एकाच ठिकाणी खेळाडू त्यांच्या सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहू शकतात. खेळाडूंच्या हॉटेलमधील खोलीचे असे चित्रीकरण समोर येत असेल, तर ते निराशाजनक आहे,’’ असे द्रविडने सांगितले.

तसेच दिनेश कार्तिकच्या तंदुरूस्तीबाबत द्रविड म्हणाला, ‘‘कार्तिकने सरावात सहभाग घेतला असला, तरी तो पूर्ण तंदुरुस्त दिसला नाही. कार्तिकच्या हालचाली संथ होत्या. त्याच्या समावेशाबाबत सामन्यापूर्वीच निर्णय घेतला जाईल.’’

बाहेर काय चर्चा होते, याला महत्त्व नाही. आम्ही अशा चर्चेकडे लक्षही देत नाही. आमच्या मनात काही नियोजन आहे. विराट कोहलीबाबतही अशीच चर्चा होत होती; पण, आज कोहलीला लय गवसल्यावर चित्र बदलले आहे. राहुलबाबतही असेच घडेल. 

राहुल द्रविड, भारतीय संघाचे प्रशिक्षक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian team management has full backing to kl rahul says rahul dravid zws