भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यांनी भारतीय पुरुष आणि महिला खेळाडूंमधील भेदभाव कायमचा मिटवून टाकला आहे. तो कसा, तर बीसीसीआयच्या वार्षिक केंद्रीय करारात सामील असलेल्या महिला खेळाडूंना सर्व पुरुष खेळाडूं इतकेच समान शुल्क मिळणार असल्याची घोषणा केली. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जय शाह यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, “भेदभावाचा सामना करण्यासाठी बीसीसीआयने पहिले पाऊल टाकले आहे आणि त्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन धोरण लागू करत आहोत. क्रिकेटमधील समानतेच्या नवीन युगात जात असताना पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल.” यावर दिग्गज क्रिकेटपटूंसह अनेक महिला खेळाडूंनी देखील आभार मानले आहेत.

जय शाह यांची घोषणा

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सांगितेल की, “पुरुषांना आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एका सामन्यासाठी ३ लाख रुपये मिळतात. आता हीच फी महिला खेळाडूंनाही मिळेल.” यासोबतच त्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल अपेक्स काऊंसिलचेही आभार मानले. त्यांनी लिहिले की, “भारतीय महिला क्रिकेट संघाला पुरुषांच्या संघाइतके समान सामना शुल्क दिले जाईल. कसोटीसाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख आणि आंतरराष्ट्रीय टी२० साठी ३ लाख रुपये मिळतील. वेतन समानता ही आमच्या महिला क्रिकेटपटूंसाठी माझी बांधिलकी होती आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी अपेक्स काऊंसिलचे आभार मानतो.”

सचिव जय शाह यांच्या मोठ्या घोषणेवर भारतीय महिला क्रिकेटपटूंनी बीसीसीआयच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आभार देखील मानले आहेत. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्टार फलंदाज स्मृती मंधाना यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया म्हटले की, “महिला आणि पुरुषांसाठी वेतनाच्या समानतेच्या निर्णयामुळे भारतातील महिला क्रिकेटसाठी खरोखरच आनंदाचा दिवस आहे. बीसीसीआय आणि जय शाह यांचे आभार”, अशा आशयाचे ट्विट करून हरमनप्रीत कौरने आभार मानले. त्यामुळे खरोखरच सर्व महिला खेळाडूंना हे शाह यांच्याकडून भाऊबीजेचे एक गिफ्ट आहे असे म्हणायला हरकत नाही.

बोर्डाच्या या निर्णयानंतर आता महिला संघाच्या खेळाडूंनाही इतकेच सामना शुल्क मिळेल, ज्यामुळे त्यांच्या वार्षिक पगारावर मोठा परिणाम होईल. संघ २०२० टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. या वर्षी ऑगस्टमध्ये या संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने समान वेतनाबाबत मोठा निर्णय घेतला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian womens cricket bccis ya announcement appreciated from all levels many women cricketers thanked avw