संयुक्त अरब अमिरातीमध्ये रविवारपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत आहे. रविवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेआधी एकीकडे जोरदार सराव सुरु असताना दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघावर मराठी भाषेनं गारुड केल्याचं चित्र दिसत आहे. बुधवारीच मुंबई इंडियन्सच्या संघाची खास मराठमोळी जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक मजेदार फोटो शेअर करत त्याला मराठमोळी कॅप्शन देण्यात आलीय.

नक्की पाहा हे फोटो >> आईच्या भीतीपोटी लागलेल्या सवयीमुळे बुमरा आज झालाय ‘यॉर्कर किंग’

बुधवारी मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या मराठी जाहिरातीमध्ये जसप्रीत बुमराह, ईशान किशन ते हार्दिक पांड्या असे संघाचे स्टार खेळाडू गाण्याच्या चालीवर थिरकताना दिसत आहे. या व्हिडीओत संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी मराठीत “महाराष्ट्रातील प्रत्येक फॅमिलीचा अभिमान आहे मुंबई इंडियन्स” असे म्हटले आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आहे.

नक्की पाहा हे फोटो >> विराटला त्या सेलिब्रेशनमुळे ‘Classless’ म्हणणाऱ्या ब्रिटीश मीडियाचा जाफरने उतरवला माज

मात्र यानंतर आता मुंबई इंडियन्सने शेअर केलेला एक फोटोही चर्चेत आहे. खेळाडूंची राहण्याची व्यवस्था केलेल्या इमारतीच्या बाल्कनीमधून मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सुर्यकुमार यादव आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हे दोघे काहीतरी बोलताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू बाल्कनीत आपल्या पत्नीसोबत उभे आहेत. सुर्या हा वरच्या मजल्यावरुन खालच्या मजल्यावर उभ्या असणाऱ्या बुमराहला काहीतरी विचारताना दिसतोय. हा फोटो शेअर करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने खास मराठमोळी कॅप्शन देताना फोटो दुबईतील असला तरी तो कॅप्शनमुळे मुंबईतील वाटावा अशी शक्कल लढवलीय. सध्या फोटोला देण्यात आलेली ही उपहासात्मक कॅप्शन फारच चर्चेत आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : बुमराच्या घातक यॉर्करमागील तंत्र; कोणत्याही फलंदाजाला क्रीज टीकून राहणंही का होतं मुश्कील?

या फोटोत वरच्या मजल्यावरुन बुमराहशी बोलणारा सुर्यकुमार यादव बुमराहला, “अहो! तुमच्याकडे पाणी येतंय का?” असा प्रश्न विचारत असल्याची शंका उपस्थित करणारी कॅप्शन फोटोला देण्यात आलीय. या कॅप्शनसोबत इमोजीही वापरण्यात आलेत.

मुंबईतील अनेक जुन्या चाळींमध्ये किंवा इमारतींमध्ये पाण्याची समस्या असल्यावर ज्याप्रकारे गृहिणी एकमेकींच्या घरी पाणी आहे की नाही याची चौकशी करतात तसाच फील हा फोटो पाहून येत असल्याचं मुंबई इंडियन्सला म्हणायचं आहे.

नक्की वाचा >> “लंच ब्रेकनंतर बुमरा माझ्याकडे आला आणि म्हणाला…”; ओव्हलवरील कसोटी सामन्याला कलाटणी देणाऱ्या त्या क्षणाबद्दल विराटचा खुलासा

पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारा मुंबईचा संघ या स्पर्धेचा विजेता होण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.