इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये सोमवारी भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी ओव्हलवर भारतीय संघाने विजयी पताका फडकावला. भारतीय संघ सपाट खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करु शकणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी हा अंदाज चुकीचा ठरवत इंग्लंडच्या संघाला ऑल आऊट करण्याचा पराक्रम केला. यामध्ये सर्वच भारतीय गोलंदाजांनी भन्नाट गोलंदाजी केली असली तरी जसप्रीत बुमराने लंच ब्रेकनंतर केलेल्या भन्नाट गोलंदाजीमुळे सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकण्यास सुरुवात झाली. मात्र लंचनंतर नक्की बुमराला का गोलंदाजी देण्यात आली याचा खुलासा सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने केलाय.

नक्की पाहा हे फोटो >> विराटला त्या सेलिब्रेशनमुळे ‘Classless’ म्हणणाऱ्या ब्रिटीश मीडियाचा जाफरने उतरवला माज

सामन्यात काय घडलं?

रविवारच्या बिनबाद ७७ धावांवरून पुढे खेळताना रॉरी बर्न्‍स आणि हसीब हमीद यांनी अर्धशतके झळकावतानाच शतकी भागीदारी रचली. परंतु शार्दूलचे गोलंदाजीसाठी आगमन होताच त्याने बर्न्‍सचा (५०) अडथळा दूर केला. डेव्हिड मलान (५) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाने हमीदचा (६३) त्रिफळा उडवला. १४१ धावांवर तिसरा बळी गमावल्यानंतर मात्र इंग्लंडची घसरगुंडी उडाली. जसप्रीत बुमराने जॉनी बेअरस्टो (०) आणि ऑली पोप (२) यांना त्रिफळाचीत करून इंग्लंडच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला.

नक्की पाहा हे फोटो >> आईच्या भीतीपोटी लागलेल्या सवयीमुळे बुमरा आज झालाय ‘यॉर्कर किंग’

फिरकीपटू जडेजाने मोईन अलीला (०) पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. मात्र शार्दूलने दुसऱ्या स्पेलमध्ये इंग्लंडचा सर्वाधिक भरवशाचा फलंदाज जो रूटला (३६) त्रिफळाचीत करून भारताचा विजय सुनिश्चित केला. ख्रिस वोक्स (१८), क्रेग ओव्हर्टन (१०) यांनी थोडा वेळ भारताचा विजय लांबवला. मात्र उमेश यादवने या दोघांना माघारी पाठवले. अखेर ९३व्या षटकात उमेशनेच जेम्स अँडरसनला बाद केले आणि कोहलीसह सर्व खेळाडू आणि स्टेडियममधील चाहत्यांनी एकच जल्लोष केला. विशेष म्हणजे लंच ब्रेकनंतर सामन्यामध्ये भारताने दमदार पुनरागमन केलं. यासाठी बुमराने टाकलेला भन्नाट स्पेल कारणीभूत ठरला. याचसंदर्भात विराटकडे पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये विचारणा करण्यात आली असता त्याने बुमराने स्वत: गोलंदाजी करण्याची इच्छा व्यक्त केली होती असं विराट म्हणाला.

नक्की पाहा >> एक विजय अन् पाच विक्रम… विराट ‘सर्वश्रेष्ठ’ कर्णधार; रिकी पाँण्टींगला मागे टाकत केला ‘हा’ विश्वविक्रम

बुमरा म्हणाला मला गोलंदाजी करु दे

“ज्याप्रकारची सकारात्मक विचारसणी संघाने सामन्यात दाखवली ती फारच कौतुकास्पद आहे. आम्ही हा सामना वाचवण्याच्या दृष्टीने नाही तर जिंकण्याच्या विचारानेच मैदानात उतरलो होतो. संघ ज्याप्रकारे खेळलाय त्याचा मला फार अभिमान आहे. परिस्थिती थोडी चिंताजनक होती मात्र रविंद्र जडेजा रफ पिचवर गोलंदाजी करणार असल्याने त्याच्याकडे विकेट्सची संधी असल्याची आम्हाला जाणीव होती. आज रिव्हर्स स्विंग करणाऱ्या गोलंदाजांनीही छान कामगिरी केली. आम्हाला विश्वास होता की आम्ही इंग्लंडच्या संघाला बाद करु शकतो. सर्व १० विकेट्स आपण घेऊ शकतो असा आम्हाला विश्वास होता. लंच ब्रेकनंतर बुमरा माझ्याकडे आला आणि म्हणाला मला गोलंदाजी करु दे. त्यानंतर त्याने टाकलेला स्पेल आमच्यासाठी फारच फायद्याचा ठरला. त्याने दोन महत्वाचे गडी तंबूत परत पाठवल्याने सामना आमच्या बाजूने फिरला,” असं विराटने सांगितलं.

नक्की वाचा >> समजून घ्या : बुमराच्या घातक यॉर्करमागील तंत्र; कोणत्याही फलंदाजाला क्रीज टीकून राहणंही का होतं मुश्कील?

बुमराने २२ षटकांमध्ये ९ षटकं निर्धाव टाकली. त्याने २७ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स घेतल्या. उमेश यादवने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूरने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने १४ षटकं टाकली मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही.