IPL २०१९ मध्ये सध्या ऋषभ पंत खूप चर्चेत आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलेली ७८ धावांची खेळी अजूनही साऱ्यांच्या स्मरणात आहे. धोनी आणि इतर दिग्गज क्रिकेटपटूंकडून त्याने धडे घेतले आहेत. पण सध्या ऋषभ पंतच एका लोकप्रिय खेळाडूला क्रिकेटच्या स्ट्रोक्सचे धडे देताना दिसत आहे. जलतरण म्हटले की भल्याभल्यांना आठवतो तो दिग्गज ऑलिम्पिक विजेता मायकल फेल्प्स. सध्या ऋषभ पंत त्याला क्रिकेटमधील ‘स्ट्रोक्स’ शिकवत आहेत.

भारताचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने काही दिवसांपूर्वी दिग्गज ऑलिंपियन मायकल फेल्प्सची भेट घेतली. यावेळी त्याने या महान जलतरणपटूला क्रिकेटमधील बारकावेदेखील सांगितले आहेत. फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये जलतरणाच्या विविध प्रकारात २००४ ते २०१६ या कालावधीत तब्बल २८ पदके जिंकली. त्यातील २३ सुवर्णपदके होती. फेल्प्स काही दिवसांसाठी भारतात आला आहे. त्यामुळे त्याने भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असणाऱ्या क्रिकेटचे ‘स्ट्रोक्स’ शिकण्याचा प्रयत्न केला. त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या सरावादरम्यान खेळाडूंची भेट घेतली.

या वेळी त्याने खेळाडूंबरोबर वेळ घालवत चर्चा केली. तसेच त्याने पंतकडून फलंदाजी शिकण्याचाही प्रयत्न केला आणि काही फटके मारण्याचाही प्रयत्न केला. त्याने खेळाडूंबरोबर काढलेले फोटो आणि व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्स संघाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दिल्ली संघाने आत्तापर्यंत IPL २०१९ मध्ये दोन सामने खेळले आहेत. यातील मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ३७ धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात ऋषभ पंतने दमदार २७ चेंडूत ७८ धावा केल्या होत्या. त्यात त्याने ७ चौकार आणि ७ षटकार खेचले होते. तर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्लीच्या संघाला पराभव पत्करावा लागला होतो.

दिल्लीचा पुढील सामना शनिवारी (३० मार्च) कोलकता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर- फिरोजशहा कोटला स्टेडियमवर होणार आहे.